ताथवडे : पुणे-मुंबई महामार्गावरील मुंबईच्या दिशेने जाणार्या रस्त्यालगत असणार्या शनी मंदिराजवळील बस थांब्याला खाजगी वाहनांनी विळखा घातला आहे. यामुळे प्रवाशांना तसेच पादचार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. वाहतूक पोलिस या ठिकाणी कोणतीही कारवाई करत नसल्याने नागरिकांनी खंत व्यक्त केली आहे.
येथील बस थांब्याजवळ नेहमी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. या बस थांब्याजवळ मुंबईकडे जाणारी वाहने थांबतात. त्यामुळे खाजगी वाहने, रिक्षा, बसेस यांची नेहमी वर्दळ या ठिकाणी पाहायला मिळते.परंतु काही बेशिस्त वाहनचालक या बस थांब्याजवळच आपली वाहने लावतात. त्यामुळे पीएमपीएमएलच्या बसेस थांबणार कुठे? असा उद्विग्न प्रश्न प्रवाशी करत आहेत.
सध्या शाळा, महाविद्यालये चालू झालेली आहेत तसेच या परिसरात मोठ्या प्रमाणावर कामगार वर्ग येतो. या बस थांब्यावर मोठी गर्दी असते. या थांब्यावरून देहूरोड कडे तसेच तळेगाव कडे जाणार्या बसेस थांबतात. बसथांब्या जवळच खाजगी वाहने, रिक्षा लावल्याने सायंकाळच्या वेळी महामार्गावरील मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. मोठी खाजगी वाहने, क्रेन, जेसीबी अशी मोठी वाहनेही बस थांब्याजवळ लावल्याने बसचालकाला प्रवासी दिसत नाहीत त्यामुळे काही प्रसंगी बस येथे थांबत नाहीत.
मुळातच या मार्गावर कमी प्रमाणात बस धावतात. त्यातच याठिकाणी खाजगी वाहने उभी असल्याने काही बसचालक येथे बस थांबवित नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बसच्या मागे धावावे लागते. परिणामी प्रवाशांना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे येथील बस थांब्या जवळील लावण्यात येणार्या वाहनांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.