उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ६ ऑगस्ट रोजी होणार मतदान | पुढारी

उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर; ६ ऑगस्ट रोजी होणार मतदान

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरु असताना भारतीय निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. सध्याचे भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्ट रोजी संपणार असल्यामुळे निवडणूक आयोगाने उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर केली आहे.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल त्याच दिवशी जाहीर होणार आहे. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार, अनुप चंद्रा पांडे यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. संसदेच्या या पावसाळी अधिवेशनात राष्ट्रपतीपदाबरोबरच उपराष्ट्रपतीपदाची निवडणूकदेखील पार पडणार आहे.

विद्यमान उपराष्ट्रपती वैंकय्या नायडू यांचा कार्यकाळ १० ऑगस्टला समाप्त होत आहे. या निवडणुकीत लोकसभा आणि राज्यसभेचे सदस्य मतदान करतात. १६ व्या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी राज्यसभेचे २३३ सदस्य, १२ नियुक्त सदस्य तसेच लोकसभेचे ५४३ सदस्य मतदान करतील, असे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. उपराष्ट्रपती पदासाठी वैंकय्या नायडू यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. भाजपकडून मुख्तार अब्बास नकवी यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.

लोकसभेत एनडीए कडे मुबलक संख्याबळ आहे. तर, राज्यसभेत एकट्या भारतीय जनता पक्षाचे १०० च्या जवळपास सदस्य आहेत.अशात या पदासाठी विरोधकांच्या उमेदवार घोषणेनंतर भाजपकडून उमेदवार देण्याची शक्यता आहे.

अशी असेल प्रक्रिया

उपराष्ट्रपतीपदासाठी ६ ऑगस्टला मतदान होईल. त्याच दिवशी निकाल जाहीर होईल. ५ जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १९ पर्यंत आहे. निवडणूक आयोगाकडून २० जुलै रोजी अर्जांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २२ जुलै पर्यंत असेल.

हेही वाचा

Back to top button