देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत १७,०७३ नवे रुण, २१ मृत्यू | पुढारी

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णसंख्येत वाढ, २४ तासांत १७,०७३ नवे रुण, २१ मृत्यू

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोनाचा धोका कायम आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १७,०७३ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, देशातील सक्रिय रुग्णसंख्या १,८४४ ने वाढून ९४,४२० वर पोहोचली आहे. सक्रिय रुग्णसंख्येतील वाढ ही ०.२१ टक्के आहे. तसेच दैनंदिन कोरोनासंसर्गदर ५.६२ टक्क्यांवर पोहोचला असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशात आठवडाभरात सुमारे १ लाख नवे रुग्ण आणि १०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याआधीच्या दिवशी देशात कोरोनामुळे २५ मृत्यूंची नोंद झाली होती. त्यात सर्वाधिक १० मृत्यू हे केरळमधील होते. दिल्लीत ६, महाराष्ट्रात ४ जणांचा मृत्यू झाला होता.

देशात गेल्या २४ तासांत १५,२०८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशात आतापर्यंत कोरोनाने ५ लाख २५ हजार २० जणांचा बळी घेतला आहे. देशात आतापर्यंत लसीचे १९७ कोटी ११ लाख ९१ हजार ३२९ डोस देण्यात आले असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली आहे. राज्यात रविवारी १,४७२ नवीन रुग्ण आढळून आले होते. यामुळे सक्रिय रुग्णसंख्या ७,४५८ वर पोहोचली आहे.

पुणे शहरात कोरोनाचे नवीन ९९६ रुग्ण

कोरोनाच्या चौथ्या लाटेत पुणे जिल्ह्यात रविवारी सर्वाधिक ९९६ रुग्णांची नोंद झाली. मात्र, कोरोनाच्या काही रुग्णांचे अहवाल शनिवारचे असून, त्याचा समावेश रविवारच्या आकडेवारीत केल्याने ही संख्या वाढल्याची माहिती आरोग्य खात्याने दिली. शहरात आढळलेल्या रुग्णांची संख्या ६७२ इतकी आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये २२५ आणि ग्रामीणमध्ये ९९ रुग्ण आढळून आले आहेत. पालखी सोहळा दोन दिवस मुक्कामी राहिल्याने पुण्याला राज्य शासनाकडून कोरोना रुग्ण वाढण्यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोरोनाच्या बीए ४ व बीए ५ या नवीन व्हेरिएंटची बाधा झालेले रुग्ण आढळून येत असून, त्यांची संख्या पुणे, मुंबईत वाढताना दिसून येत आहे.

महाराष्ट्रात बीए व्हेरिएंटचे पाच रुग्ण

राज्यात बीए ४ व्हेरिएंटचे ३ तर बीए ५ व्हेरिएंटचे २ असे एकूण पाच रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी तीन पुरुष, तर दोन स्त्रिया आहेत. सर्व रुग्ण मुंबई येथील असून, त्यांचा अहवाल पुणे बी. जे. वैदयकीय प्रयोगशाळेने दिला आहे. राज्यातील या रुग्णांची संख्या ५४ झाली आहे.

Back to top button