नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, कारागृहातील नऊ कैदी कोरोनाबाधित | पुढारी

नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ, कारागृहातील नऊ कैदी कोरोनाबाधित

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. हे लक्षात घेता नागरिकांनी काळजी घ्यावी आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरीत कोरोना नियमांचे पालन करावे असे, आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे. त्या नंतरही नागरिक बेफिकीर वागत असल्याचे दिसून येते. परिणामी कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. २३ जून रोजी नागपुरात ९५ तर २४ जून रोजी ६५ कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली.

या शिवाय नागपूर कारागृहातील नऊ कैद्यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती महापालिका आरोग्य अधिकाऱ्याने दिली आहे. संसर्गाची वाढती संख्या पाहता, चार दिवसांपूर्वी कारागृहातील १२ कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. शुक्रवारी सायंकाळी आणखी ५ कैद्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. माहितीनुसार, कैद्यांमध्ये सौम्य लक्षणे असून त्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे.

नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार होत असले तरी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही जास्त आहे. सोमवार २० जून रोजी १७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले. यात शहरातील ३ आणि ग्रामीणमधील १४ जणांचा समावेश आहे. तर मृत्यू एकही नाही. सध्या एकूण सक्रिय रुग्ण ३१७ असून यामध्ये ग्रामीणचे १२० व शहरातील १९७ आहे. सोमवारी ४३ रुग्ण बरे झाले. यात शहरातील २० आणि ग्रामीणचे ७ रुग्ण आहेत.

सध्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत चढउतार होत आहे. ११ जून रोजी ५५ कोरोना बाधितांची नोंद झाली. यात शहरातील ३४, ग्रामीणचे १९ आणि बाहेरील जिल्ह्याचे २ रुग्ण होते. १० जून रोजी ४३ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. (शहरातील २९, ग्रामीणचे ११ आणि बाहेरील जिल्ह्याचे ३) १२ जून रोजी ४० कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. (शहरातील २७, ग्रामीणचे १२ आणि बाहेरील जिल्ह्याचे १), १३ जून रोजी २७ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली. (शहरातील २०, ग्रामीणचे ०७ आणि बाहेरील जिल्ह्याचे ०). या शिवाय १४ जून रोजी ३३, १५ जून रोजी ५०, १७ जून रोजी ६१ कोरोना बाधितांची नोंद करण्यात आली.

Back to top button