

लखनौ ः हरिओम द्विवेदी उत्तर प्रदेशातील आझमगड आणि रामपूर लोकसभा पोटनिवडणुकीत समाजवादी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. भाजपने या दोन्ही जागा जिंकत सपाच्या बालेकिल्ल्यात कमळ फुलवले आहे.
रामपूर येथे भाजपचे उमेदवार घनश्याम लोधी यांनी सपाचे उमेदवार आसिम रजा यांचा 42 हजार 192 मतांनी पराभव केला तर आझमगड येथे भाजपच्या दिनेश लाल यादव ऊर्फ निरहुआ यांनी सपाचे उमेदवार आणि अखिलेश यादव यांचे चुलत बंधू धर्मेंद्र यादव यांचा 11 हजार 212 मतांनी पराभूत केले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत या दोन्ही जागांवर सपाने विजय मिळवला होता. तथापि, 2022 मध्ये विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर समाजवादी पार्टीचे प्रमुख अखिलेश यादव यांनी आझमगड आणि आझम खान यांनी रामपूर या लोकसभा मतदारसंघातून राजीनामा दिला होता.
रामपूर येथे समाजवादी पार्टीपेक्षाही आझम खान यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निवडणूक प्रचारात त्यांनी मुस्लिम समुदायाला भावनिक आवाहन केले होते. 'पराभूत करून माझे तोंड काळे करू नका', असेही ते म्हणाले होते. तरीही मतदारांनी सपाला नाकारले. आता आझम खान यांनी मतदानात गोंधळ झाल्याचे म्हटले आहे. भाजपचे प्रदेश प्रवक्ता हरीश श्रीवास्तव म्हणाले की, या विजयाने सिद्ध केले आहे की, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप राज्यातील सर्व 80 जागा जिंकणार आहे.
रामपूरप्रमाणेच आझमगडही सपाचा बालेकिल्ला मानला जातो. 2014 मध्ये येथून स्वतः मुलायमसिंह यादव आणि 2019 मध्ये अखिलेश यादव यांनी येथून विजय मिळवला होता. याचवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत येथे सपाने भाजपचा सुपडा साफ करताना सर्व 10 जागांवर विजय मिळवला होता. बाहेरचा उमेदवार, बसपाचा मजबूत उमेदवार आणि भाजपचे बूथ पातळीवरील नियोजन यामुळे सपाच्या गडात भाजपने विजय मिळवल्याचे सांगितले जात आहे.
पंजाबमधील संगरूर या लोकसभा मतदारसंघात शिरोमणी अकाली दलाच्या सिरमनजीतसिंह मान यांनी 5822 मतांनी विजय मिळवला. आम आदमी पक्षाचे गुरमेलसिंह दुसर्या स्थानी राहिले. तर काँग्रेसचे दलवीर गोल्डी तिसर्या स्थानी राहिले. इतर उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली. संगरूर हा भगवंत मान यांचा लोकसभा मतदारसंघ होता. येथूनत्यांनी दोनवेळा निवडणूक जिंकली होती.
विधानसभेच्या सातही जागांवर पोटनिवडणूक झाली. त्यापैकी त्रिपुरातील 4 जागांपैकी 3 जागांवर भाजप आणि 1 जागा काँग्रेसने जिंकली. त्रिपुराचे मुख्यमंत्री माणिक साहा यांनी बारदोवाली येथून पोटनिवडणूक जिंकली. आंध्र प्रदेशातील आत्मकूर मतदारसंघात मेकापती गौतम रेड्डी यांच्या मृत्यूनंतर ही जागा रिक्त झाली होती. येथे वायएसआर काँग्रेसने रेड्डी यांचे बंधू विक्रम रेड्डी यांना मैदानात उतरवले होते. त्यांनी 82 हजार 888 मतांनी विजय मिळवला. तर झारखंडच्या मांडर या जागेवर काँग्रेसने विजय मिळवला. दिल्लीतील राजेंद्रनगर मतदारसंघाचे आमदार राघव चड्ढा राज्यसभेत निवडून गेल्यानंतर येथे झालेल्या पोटनिवडणूक आम आदमी पक्षाच्याच दुर्गेश पाठक यांनी 11 हजार 468 मतांनी विजय मिळवला.
लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपच्या विजयाने सरकारच्या धोरणावर आणि सुशासनावर मोहर उमटवली आहे. जनतेने घराणेशाहीला पूर्णतः नाकारत 2024 साठी स्पष्ट संदेश दिला आहे.
– योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश
हेही वाचा