

पणजी : पुढारी वृत्तसेवा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी बेकायदेशीर जमीन हडप, हस्तांतरण प्रकरणांमध्ये एसआयटीने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतला. त्यावेळी त्यांनी अधिकार्यांना सूचना दिल्या.
राज्यातील जमीन बळकावण्याच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. एसआयटीने आतापर्यंत विक्रांत शेट्टी (रा. मडगाव) याला 12 जून रोजी अटक केली. मोहम्मद सोहेल (रा. सांतीनेज पणजी) याला 21 जून रोजी अटक केली आहे. बांदोडा-फोंडा येथील दिरेश नाईक याला दोन दिवसांपूर्वी अटक केली होती. तो पुराभिलेख विभागाचा कर्मचारी आहे. ज्याने पुराभिलेख विभागाकडून लुक रजिस्टर काढले आणि बनावट कागदपत्रांसाठी आरोपींना दिले. शिवानंद मडकईकर (रा. मडकई फोंडा) याला 24 जून रोजी अटक केली होती.
आरोपींकडून असे उघड झाले, की काही मालमत्तांचे कोणतेही कायदेशीर वारस नाहीत, मालक मरण पावले आहेत किंवा स्थलांतरित झाले आहेत. त्यांच्या जमिनी बनावट कागदपत्रे करून हडपण्याचे प्रकार घडले आहेत. या सर्व प्रकरणांचा आढावा घेतल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
आज महत्त्वाची बैठक
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी याच प्रकरणी महत्त्वाची बैठक दि. 27 जून रोजी बोलावली आहे. या बैठकीला महसूल मंत्री, मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, महसूल सचिव आणि एसआयटीचे प्रभारी उपस्थित राहणार आहेत. एकूणच तपासाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आणि पुढील कारवाईचा निर्णय घेण्यासाठी ही उच्चस्तरीय बैठक आहे. नोंदणीकृत मालक किंवा हक्कदार मरण पावले आहेत किंवा उत्तराधिकारी कार्यवाही न करता स्थलांतरित झाले आहेत. त्यावरही बैठकीत चर्चा होईल. एसआयटीने अटक केलेल्या आरोपींनी उघड केल्यानुसार त्यांनी जवळपास 70 मालमत्तांची बनावट कागदपत्रे तयार केली होती. ज्यापैकी बहुतांश मालमत्ता वर नमूद केल्याप्रमाणे समान स्वरूपाच्या होत्या.
हेही वाचा