आसामात पूरबळी संख्या 108 वर | पुढारी

आसामात पूरबळी संख्या 108 वर

गुवाहाटी : पीटीआय आसाममधील पूरस्थितीने भीषण रूप धारण केले असून 45 लाख 34 हजार नागरिकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि बराक या नद्यांंसह त्यांच्या उपनद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत असून पाणी पातळीत वाढ होत चालली आहे. आसाम मधील पूरबळींची संख्या 108 वर पोहोचली आहे. पैकी गेल्या 24 तासांत 7 मृत्यूंची नोंद झाली आहे.

सिलचर हा भाग बराक खोर्‍याचे प्रवेशद्वार मानला जातो. हा संपूर्ण भाग पाण्याखाली गेला आहे. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पूरग्रस्त भागात विशेषतः कचर भागात पथके नेमली आहेत. याशिवाय इटानगर आणि भूवनेश्‍वर येथून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची पथके, 207 कर्मचार्‍यांना बोलावले आहे. लष्कराच्या पथकांसह 120 सदस्य दीमापूर येथे तैनात केले आहेत. त्यांच्यासोबत नऊ बोटीदेखील आहेत. राज्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण दले, सीआरपीएफचे जवान सिलचर भागात तैनात केले आहेत. सरकारने हेल्पलाईन नंबरही जारी केले आहेत.

सुमारे तीन लाख नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा आणि औषधांचा तुटवडा भासत आहे. खाद्यपदार्थांची पाकिटे, पाण्याच्या बाटल्या आणि इतर गजेच्या वस्तू हवाईदलाच्या हेलिकॉप्टरमधून या भागात टाकली जात आहेत. बारपेटा जिल्ह्यात सर्वाधिक फटका कचर, हैलाकंदी आणि करीमगंज हे तीन जिल्हे बराक आणि कुशियारा नद्यांच्या पुरात वेढली गेली आहेत. बारपेटा जिल्ह्यात सर्वाधिक 10 लाख 32 हजार 561 नागरिकांना फटका बसला आहे. तर कामरूप जिल्ह्यात 4 लाख 29 हजार 166 नागरिकांना बेघर व्हावे लागले आहे.

173 रस्ते, 20 पुलांचे नुकसान

103 महसुली विभागातील 4536 गावे पुरात वेढली गेली आ हेत. येथील 2 लाख 84 हजार 875 नागरिकांनी शिबिरांमध्ये तात्पुरता आसरा घेतला आहे. पुरामुळे 173 रस्ते आणि 20 पुलांचे नुकसान झाले आहे. 1 लाख 869 हेक्टरवरील पिके पुराखाली गेली आहेत.

हेही वाचा

Back to top button