बाजार समित्यांच्या निवडणुका ऑगस्टनंतर; उच्च न्यायालयाचा आदेश | पुढारी

बाजार समित्यांच्या निवडणुका ऑगस्टनंतर; उच्च न्यायालयाचा आदेश

पुणे : पुढारी वृत्तसेवा: राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने राज्यातील 18 हजारांपैकी 13 हजार 913 विकास सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण केल्याच्या प्रयत्नांची उच्च न्यायालयाने प्रशंसा केली आहे. उर्वरित सोसायट्यांच्या निवडणुका ऑगस्टअखेर पूर्ण कराव्यात, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे राज्यातील 307 पैकी निवडणुका घेणे क्रमप्राप्त असलेल्या सुमारे अडीचशेहून अधिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांनाही ऑगस्ट महिन्यानंतरच मुहूर्त लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांपूर्वी मतदार असलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुका प्राधान्याने घेण्याचा आदेश यापूर्वी उच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे बाजार समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. आता ऐंशी टक्क्यांहून अधिक विकास सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण झाल्या असल्या, तरी उर्वरित गावपातळीवरील विकास सोसायट्यांच्या निवडणुकांसाठी चार महिन्यांनी मुदतवाढ मागण्यासाठी प्राधिकरणाने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमीर्ती संदीपकुमार मोरे यांच्या खंडपीठाने ऑगस्टअखेरची मुदत प्राधिकरणास देण्याचा आदेश दिला आहे.

प्राधिकरणाने 18 हजारांपैकी 9 जून 2022 पर्यंत 13 हजार 913 सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण केल्या आहेत. उर्वरित 2 हजार 587 सोसायट्यांमध्ये निवडणुका घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर, सुमारे 1 हजार 502 सोसायट्यांनी निवडणूक खर्च जमा केलेला नाही. तसेच, मतदार यादी तयार करण्याकामीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्राधिकृत अधिकार्‍यांची नियुक्ती केली आहे. जेणेकरून निवडणुका घेणे
सुलभ होईल. अर्जदार प्राधिकरणाने घेतलेल्या प्रयत्नांची आम्ही प्रशंसा करतो आणि सर्व माहिती विचारात घेता 1 मे 2022 पासून पुढे चार महिन्यांनी राहिलेल्या विकास सोसायट्यांच्या निवडणुका पूर्ण करण्याबाबतचा कालावधी निवडणूक प्राधिकरणास वाढवून देत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

हेही वाचा

‘एमपीएससी’कडून आता लिपिक, टंकलेखक भरती; राज्यसेवा आयोगाने प्रस्ताव केला सादर

शिरूरचे मतदार टिंगरेनगरमध्ये; प्रारूप मतदारयादीत घोळ

बाळासाहेबांना सामान्य कुटुंबातील शिवसैनिक मुख्यमंत्रीपदी हवा होता : दीपक केसरकर

Back to top button