TMC Protest : बंडखोर आमदारांच्‍या ‘पाहुणचारा’वर तृणमूल आक्रमक, रॅडिसनं हॉटेलबाहेर तीव्र निदर्शने | पुढारी

TMC Protest : बंडखोर आमदारांच्‍या 'पाहुणचारा'वर तृणमूल आक्रमक, रॅडिसनं हॉटेलबाहेर तीव्र निदर्शने

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
आसाम राज्‍यात सध्‍या भीषण पूरस्‍थिती आहे. तब्‍बल ५४ लाखांहून अधिक नागरिकांना महापुराचा फटका बसला आहे. पुरग्रस्‍तांना मदत करायचे सोडून आसाममधील भाजप सरकार महाराष्‍ट्रातील शिवसेनेच्‍या बंडखोर आमदरांच्‍या पाहुणचारात मग्‍न आहे, असा आरोप करत राज्‍य सरकारने प्रथम पूरग्रस्‍तांना मदत करावी, अशी मागणी करत गुवाहाटी येथील हॉटेल रॅडिसनं बाहेर तृणमूल काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने ( TMC Protest ) केली. यावेळी भाजप सरकारचा तीव्र निषेध करण्‍यात आला.

पूरग्रस्‍तांना मदत महत्त्‍वाची की, बंडखोर आमदारांचा पाहुणचार

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा हाती घेत गुजरातमधील सूरत शहर गाठलं. यानंतर त्‍यांनी बंडखोर आमदारांसह विमानाने आसाममध्‍ये तळ ठोकला आहे. आसाम समोर सध्‍या पूराचे भीषण संकट आहे. अशा परिस्‍थितीत पूरग्रस्‍तांना सोईसुविधा पुरविण्‍याचे जबाबदारी राज्‍यातील भाजपमधील सरकारची आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करत महाराष्‍ट्रातील राजकारण आसाममध्‍ये आणत राज्‍य सरकार पूरग्रस्‍तांकडे दुर्लक्ष करत आहे. राज्‍य सरकार बंडखोर आमदारांची बडदास्‍त ठेवण्‍यात मग्‍न आहे, असा आरोप करत तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते हॉटेल रॅडिसंन बाहेर आज सकाळी जमा झाले. त्‍यांनी जोरदार निदर्शने करत सरकारचा तीव्र निषेध केला.

TMC Protest : महाराष्‍ट्रातील राजकारण आसाममध्‍ये आणू नका

शिवसेना आमदारांना भाजप खरेदी करत आहे. आता त्‍यांचा पाहुणाचार करण्‍यासाठी त्‍यांना आसाममध्‍ये आणलं आहे. शिवसेनेच्‍या आमदारांना गुवाहाटीला का आणलं आहे? असा सवाल करत राज्‍यातील पूरपरिस्‍थिती गंभीर आहे. अशा परिस्‍थितीत राज्‍य सरकारने पूरग्रस्‍तांना मदत करणे आवश्‍यक आहे. मात्र आसाम पुरग्रस्‍ताकंडे राज्‍य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप तृणमूल काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी केला. महाराष्‍ट्रातील राजकारण आसाममध्‍ये आणू नका. प्रथम आसाममधील पूरस्‍थितीकडे लक्ष द्‍या. असे आवाहनही त्‍यांनी या वेळी केले.

पोलिस- तृणमूल कार्यकर्त्यांमध्‍ये धक्‍काबुक्‍की

महाराष्‍ट्रातील शिवसेना आमदारांना आसाममध्‍ये का आणले आहे, असा सवाल करत तृणमूल काँग्रेसच्‍या कार्यकर्त्यांनी राज्‍य सरकारविरोधात तीव्र निदर्शन करत हॉटेलमध्‍ये घुसण्‍याचा प्रयत्‍न केला. यावेळी पोलिसांना त्‍यांना ताब्‍यात घेतले. यावेळी पोलिस- तृणमूल कार्यकर्त्यांमध्‍ये धक्‍काबुक्‍की झाल्‍याने परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.

 

Back to top button