

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : देशात कोरोना (COVID19) रुग्णसंख्येत पुन्हा वाढ सुरु झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १३,३१३ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर ३८ मृत्यू झाले आहेत. दिवसभरात १०,९७२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात ८३,९९० सक्रिय रुग्ण आहेत. तर दैनंदिन कोरोना संसर्ग दर २.०३ टक्के एवढा आहे.
देशात मंगळवारी दिवसभरात १२ हजार २४९ कोरोनाबाधित आढळले होते. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी झालेली नवीन कोरोनाबाधितांच्या संख्येतील ही वाढ २३.४ टक्क्यांनी अधिक होती. सोमवारी ९ हजार ९२३ कोरोनाबाधित आढळले होते.
बुधवारी देशाचा दैनंदिन कोरोना संसर्गदर ३.९४ टक्के, तर आठवड्याचा कोरोनासंसर्गदर २.९० टक्के नोंदवण्यात आला होता. कोरोना विरोधातील लसीकरण अभियानातून देशात आतापर्यंत १९६.६२ कोटी डोस देण्यात आले आहेत.
पुण्यात कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणू प्रकाराच्या आणखी पाच रुग्णांचे निदान झाले आहे. 'बीए ५' या प्रकारच्या विषाणूचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. नव्या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या तेरापर्यंत पोहोचली आहे. पुणे शहरात काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या 'बीए ४' आणि 'बीए ५' या दोन प्रकारच्या विषाणूंचे रुग्ण आढळले होते. पुण्यातील आयसर या प्रयोगशाळेत या रुग्णांच्या चाचण्यांचे जिनोम सिक्वेंसिंग करण्यात आले होते. त्या तपासणीमधून २८ मे रोजी पुण्यात नव्या विषाणू प्रकाराचा शिरकाव झाल्याचे अधोरेखित झाले होते.
पुणे शहरामध्ये बुधवारी (दि. २२) २६५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. पुण्यात दोन दिवस पालख्यांचा मुक्काम असल्याने वारकर्यांनी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.