३०० रुपयांसाठी सुनेवर चिडलेल्‍या सासर्‍याची सटकली, पोलिसांवर केले ४५ राउंड फायर : फौजदारासह दोन पोलीस जखमी | पुढारी

३०० रुपयांसाठी सुनेवर चिडलेल्‍या सासर्‍याची सटकली, पोलिसांवर केले ४५ राउंड फायर : फौजदारासह दोन पोलीस जखमी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क:
नात्‍यातील वाद किती टोकाला जावू शकतो, याचा अनुभव उत्तर प्रदेशमधील कानपूर पोलिसांनी घेतला. केवळ ३०० रुपयांवरुन सुनेबरोबर वाद झाल्‍याने सासरा कमालीचा संतापला. त्‍याने आपल्‍या पत्‍नीसह मुलगा व सुनेला एका रुममध्‍ये कोंडले. घर पेटवून देण्‍याची धमकी दिली. या धक्‍कादायक प्रकाराने घाबरलेल्‍या सुनेने पोलिसांना कळवले. पोलिस दारात आल्‍यानंतर सासरा आणखीनच बिथरला. त्‍याने घरातील डबल बोर बंदुकेने तब्‍बल ४५ राउंड पोलिसांवर फायरिंग केले. यामध्‍ये फौजदारासह दोन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत. चित्रपटालाही लाजवले अशा प्रकाराने उत्तर प्रदेशमधील  कानपूर शहर हादरले आहे.

सुनेबरोबरील वाद विकोपला

कानपूरमधील श्‍यामनगर के सी ब्‍लॉकमध्‍ये आर के दुबे ( वय ६०) हे आपल्‍या कुटुंबासह राहतात. ते शेअर बाजारामध्‍ये काम करतात. त्‍यांच्‍याबरोबर त्‍यांची पत्‍नी किरण दुबे, मोठा मुलगा सिद्धार्थ, सुन भावना आणि एक दिव्‍यांग मुलगी चांदनी रहाते. तर त्‍यांचा लहान मुलगा राहुल व त्‍याची पत्‍नी जयश्री हे वेगळे राहतात. आर. के.दुबे यांचा रविवारी दुपारी मोठी सून भावनाबरोबर ३०० रुपयांवरुन वाद झाला. तो वाद विकोपाला गेल्‍याने आर के दुबे यांचे स्‍वत:वरील नियंत्रणच हरवले. प्रचंड संतापलेल्‍या दुबे यांनी पत्‍नीसह मुलगा व सुनेला घरातील एका रुममध्‍ये कोंडली आणि घरच पेटवून देण्‍याची धमकी दिली.

आम्‍हाला वाचवा: सुनेचा पोलिसांना फोन

सासर्‍याने रुममध्‍ये कोंडल्‍यानंतर सुनेने पोलिसांना फोन केला. आपल्‍या घराचा पत्ता देत लवकर आम्‍हाला वाचावा नाहीत माझा सासरा सर्वांना मारुन टाकेल, असा निरोप भावनाने पोलिसांना दिला. पोलिसांनी घटनास्‍थळी धाव घेतली.

पोलिस निलंबित होत नाहीत तोपर्यंत गोळीबार सुरुच राहिल…

पोलिस दारात आल्‍यानंतर सासरा आणखीनच बिथरला. घरातील लोकांकडून माझेच शोषण सुरु आहे आणि तुम्‍ही मलाच पकडाला आला आहात, असा सवाल करत त्‍याने घरातील डबल बोर बंदुकेने तब्‍बल ४५ राउंड पोलिसांवर फायरिंग केले. पोलिस निलंबित होत नाहीत तोपर्यंत गोळीबार सुरुच राहिल, अशी धमकीही दिली. सलग तीन तास हा थरार सुरु होता. यामध्‍ये फौजदार विनीत त्‍यागी यांच्‍यासह दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. त्‍यांनी तत्‍काळ या घटनेची माहिती वरिष्‍ठ पोलिस अधिकार्‍यांना दिली.

तीन तासांचा थरार.. व्‍हॉटस ॲपवर मेसज आणि गोळीबार थांबला

पोलिस निलंबित होत नाहीत तोपर्यंत गोळीबार सुरुच राहिल, अशी धमकी आर के दुबे याने पोलिसांना दिली होती. आता गोळीबार कसा थांबवावा, असा प्रश्‍न वरिष्‍ठ पोलिस अधिकार्‍यांसमोर होता. त्‍यांनी एक युक्‍ती काढली. वरिष्‍ठ पोलिस अधिकार्‍यांनी आर के दुबेचा फोन नंबर घेतला. त्‍याच्‍या व्‍हॉटस ॲपवर पोलिसांना निलंबित करत आहोत, असा खोटा मेसेज पाठवला. यानंतर आर के दुबेचा राग शांत झाला. त्‍याने गोळीबार थांबवला. तब्‍बल तीन तास संपूर्ण परिसराने हा थरार अनुभवला.

६० जिंवत काडतुसे जप्‍त

गोळीबार थांबल्‍यानंतर पोलिसांनी झडप घालत आर के दुबे याला ताब्‍यात घेतले. त्‍याची बंदुक जप्‍त केली. त्‍याच्‍या घरातील टेरेसवर तब्‍बल ६० जिंवत काडतुसे होती. ती जप्‍त करण्‍यात आली आहेत. त्‍याच्‍याकडे पिस्‍तुल असल्‍याची माहिती पोलिसांनी मिळाली. पोलिस त्‍याचा शोध घेत आहेत.

तीन महिन्‍यांपासून होता मुलासह सुनेबरोबर वाद

आर के दुबे याने पोलिसांना माहिती दिली की, मोठा मुलगा सिद्धार्थ व त्‍याची पत्‍नी भावनाबरोबर मागील तीन महिन्‍यांपासून वाद सुरु होता. ते माझ्‍याकडे पैशाची वारंवार मागणी करत होते. तसेच सूनेच्‍या मोहरची मंडळीही मला खूप मानसिक त्रास देत होती. याची तक्रारही मी तीन महिन्‍यांपूर्वी पोलिस ठाण्‍यात केली होती. मात्र पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्‍याचा आरोपही दुबे याने केला आहे.

 

 

 

Back to top button