नवीन संसद भवनात हिवाळी अधिवेशन घेण्याचे नियोजन : ओम बिर्ला | पुढारी

नवीन संसद भवनात हिवाळी अधिवेशन घेण्याचे नियोजन : ओम बिर्ला

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नवीन संसद भवन उभारणीचे काम वेगात सुरू असून या इमारतीत हिवाळी अधिवेशन घेण्याचे नियोजन असल्याचे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रविवारी एका खाजगी दूरचित्रवाहिनीशी बोलताना सांगितले. संसदेची नवी इमारत म्हणजे आत्मनिर्भर भारताचे मानचिन्ह असल्याची टिप्पणीही बिर्ला यांनी केली.

Assam Flood : 3 हजार गावे पाण्याखाली; 19 लाख लोक बाधित, 55 ठार

तांत्रिक आणि संरक्षणाच्या दृष्टीने नवीन संसद इमारत जुन्या इमारतीच्या तुलनेत कितीतरी उच्च दर्जाची असल्याचे सांगून बिर्ला पुढे म्हणाले की, संसदेची नवी इमारत कार्यान्वित झाल्यानंतर जुन्या इमारतीचे काय केले जाणार, असा प्रश्न विचारला जातो. तथापि जुनी इमारत हीदेखील संसदेचा एक भाग राहील. गेल्या काही काळात संसद कामकाजाची उत्पादकता मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. अलीकडील काळात तर रात्री उशिरापर्यंत संसदेचे कामकाज चाललेले आहे. सुदृढ लोकशाहीचे हे द्योतक मानावे लागेल.

संसदेचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी गंभीरता दाखविणे गरजेचे असते. कामकाज व्यवस्थित चालले तरच कामकाज उत्पादकता वाढते आणि प्रत्येक विषयावर साधकबाधक चर्चा होऊ शकते, हे वास्तव आहे, असेही बिर्ला यांनी नमूद केले.

 

Back to top button