Assam Flood : 3 हजार गावे पाण्याखाली; 19 लाख लोक बाधित, 55 ठार | पुढारी

Assam Flood : 3 हजार गावे पाण्याखाली; 19 लाख लोक बाधित, 55 ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : आसाममध्ये मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यातील अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदी पात्र सोडून पाणी नागरीवस्तींमध्ये शिरले आहे. परिणामी जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, मुसळधार पावसानंतर दरड कोसळून दोन मुलांसह नऊ जणांना जीव गमवावा लागला. या पुरामुळे आतापर्यंत ५५ लोकांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ६४ रस्त्यांचा संपर्क तुटला आहे. पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये ४३ हजार ३३८ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे.

आसामच्या चिरांग जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर झाली आहे. त्या ठिकाणची हजारो लोक बाधित झाले असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. या जिल्ह्यांतील दोन हजार ९३० गावांतील १९ लाख लोक बाधित झाले आहेत. खेड्यापाड्यातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. दरम्यान, एसडीआरएफच्या (SDRF) पथकांनी १०० हून अधिक जणांची सुखरुप सुटका केली आहे. बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, जिया भराली, कोपिली येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या पाण्याची पातळी धोक्याची पातळी ओलांडली आहे.

आसाममध्ये अतिवृष्टीनंतर आलेल्या पुरामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्याशी चर्चा कली असल्याचे समजते आहे. पंतप्रधनांनी पूर परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, केंद्र सरकारकडून मदतीचे आश्वासनही दिले आहे. खुद्द मुख्यमंत्री हिमंत बिसवा सरमा यांनी ही माहिती दिली.

Back to top button