President Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट | पुढारी

President Election 2022 : राष्ट्रपतीपदाच्या निवडणूक पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रपतीपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी (President Election 2022) केंद्रातील सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. विरोधी पक्षांकडून सर्वसहमीने उमेदवार निवडीवर चर्चा सुरु आहे. यामध्ये बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (West Bengal Chief Minister Mamata Banerjee) यांनी पुढाकार घेत मंगळवारी (दि. १४) राष्ट्रवादीचे (Nationalist Congress Party) सर्वेसर्वा तसेच ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रपती निवडणुकीच्या पाश्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी बुधवारी (दि.१५) दिल्ली येथे प्रमुख विरोधीपक्ष नेते तसेच बिगर भाजप शासित मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकी आधी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमुळे चर्चेला चांगले उधाण आले आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी (President Election 2022) १८ जुलैला मतदान होणार आहे आणि २१ जुलै रोजी मतमोजणी होऊन नव्या राष्ट्रपतीची घोषणा केली जाणार आहे. सध्याच्या राजकीय गणितानुसार भाजप जो उमेदवार देईल, तो राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत सहज विजयी होईल असे चित्र आहे. दुसरीकडे मात्र विरोधकांनी मात्र कंबर कसली असून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव विरोधकांतर्फे सध्या आघाडीवर असल्याची चर्चा आहे. मात्र शरद पवार यांनी या सर्व चर्चांना विराम देऊन आपण राष्ट्रपतीपदाची उमेदवारीसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. शरद पवार मुंबई येथे म्हणाले होते की, ‘मी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत नाही, राष्टपतीपदासाठी मी विरोधीपक्षांचा उमेदवार बनणार नाही’.

काँग्रेसकडून (congress) राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी (President Election 2022) शरद पवार यांच्या नावाला पाठिंबा देण्यात आला होता. तेव्हा पासून राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शरद पवार यांच्या नावाच्या चर्चेने जोर धरला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांना सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचा निरोप दिला होता. याशिवाय खर्गे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Chief Minister Uddhav Thackeray), तामिळनाडुचे मुख्यमंत्री एम.के.स्टॅलिन (chief Minister M.K. Stalin) यांच्याशी सुद्धा फोनवरुन शरद पवार यांच्या नावाची चर्चा केली होती.

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारी (President Election 2022) बाबत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे नेते शरद पवार इच्छुक नसल्याचे सांगितले आहे. राष्टवादीचे एक मोठे नेते तसेच महाराष्ट्रातील कॅबिनेट मंत्री असणाऱ्या मोठ्या नेत्याने असे सांगितले की, मला वाटत नाही की पवार साहेब निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पवार साहेब हे ग्रासरुटपर्यंत जाऊन लोकांशी आणि कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारे नेते आहेत. लोकांमध्ये राहून त्याच्या समस्या सोडवण्यावर त्यांचा अधिक भर असतो. त्यामुळे राष्ट्रपती बनून राष्ट्रपती भवनापर्यंत मर्यादित राहणे त्यांना आवडणार नाही’.

तरी सुद्धा देशातील प्रमुख विरोधीपक्षांनी राष्ट्रपती निवडणूक जोरदारपणे लढविण्याचा निर्धार केला आहे. यासाठी रणनिती ठरवणे व सर्वसहमीचा उमेदवार निश्चित करण्यासाठी दिल्लीमध्ये बुधवारी सर्व प्रमुख विरोधीपक्षांचे नेते तसेच बिगर भाजपशासित मुख्यमंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन ममता बॅनर्जी यांच्याकडून करण्यात आले आहे. या बैठकीस काँग्रेसकडून सोनिया गांधी सहभागी होतील असे संकेत पक्षाने दिले आहेत. आत इतर विरोधी पक्ष या बैठकीस उपस्थित राहतात का ते पहावे लागेल. कम्युनिस्ट पक्षाचे नेते सिताराम येचुरी यांनी या बैठक बोलवण्यावर ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती.

बुधवारच्या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी शरद पवारांची मंगळवारी भेट घेतली आहे. आता बुधवारच्या बैठकीत सर्व विरोधकांकडून सर्वसहमतीने राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी नवा उमेदवार निश्चित होता का पहावे लागेल.

Back to top button