नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन
देशातील दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. देशातील दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या ८ हजारांवर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८,३२९ नवे रुग्ण आढळून आले आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात ४,२१६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील कोरोनाची सक्रिय रुग्णसंख्या ४० हजारांवर पोहोचली आहे.
गुरूवारी दिवसभरात ७ हजार ५८४ कोरोनाबाधितांची भर पडली होती. तर, २४ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला होता. दरम्यान ३ हजार ७९१ रुग्णांनी कोरोनावर मात मिळवली. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.७० टक्क्यांवर घसरला. तर, दैनंदिन कोरोनासंसर्गदर २.२६ टक्के आणि आठवड्याचा कोरोनासंसर्गदर १.५० टक्के नोंदवण्यात आला होता.
देशात कोरोनाविरोधात सुरू करण्यात आलेल्या लसीकरण अभियानातून आतापर्यंत १९४ कोटी ९२ लाख ७१ हजार १११ डोस देण्यात आले आहेत. यातील ३.४९ कोटी डोस १२ ते ४४ वयोगटातील बालकांना लावण्यात आले आहेत. तर, खबरदारी म्हणून आतापर्यंत ३ कोटी ८० लाख ८१ हजारांहून अधिक बूस्टर डोस देण्यात आले आहेत. केंद्र सरकारकडून पुरवण्यात आलेल्या १९३ कोटी ५३ लाख ५८ हजार ८६५ कोरोना डोस पैकी १३ कोटी ९३ लाख ८८ हजार ७५५ डोस अद्यापही राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडे शिल्लक आहेत.
देशभरात आतापर्यंत ८५ कोटी ४१ लाख ९८ हजार २८८ कोरोना तपासण्या करण्यात आल्या आहेत. यातील ३ लाख ३५ हजार ५० तपासण्या गुरूवारी दिवसभरात करण्यात आल्याची माहिती आयसीएमआरकडून देण्यात आली आहे.