'कुतुबमीनार' संबंधी याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, साकेत न्यायालय २४ ऑगस्टला निकाल देण्याची शक्यता | पुढारी

'कुतुबमीनार' संबंधी याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली, साकेत न्यायालय २४ ऑगस्टला निकाल देण्याची शक्यता

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

राजधानी दिल्लीतील ऐतिहासिक स्मारक ‘कुतुबमीनार’ परिसरात पूजा करू देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवरील सुनावणी साकेत न्यायालयाने पुढे ढकलली आहे. आज ( दि.९) यासंबंधी निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात होती.मात्र,न्यायालयात आणखी एक याचिका दाखल करण्यात आल्याने पुजेची परवानगी देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर २४ ऑगस्टला दुपारी २ वाजता निर्णय येण्याची शक्यता आहे.

नवीन याचिकेच्या सुनावणी शिवाय निकाला सुनावणार नाही,असे न्यायालयाने स्पष्ट केले. कुतुब मीनार प्रकरणात नवीन याचिका दाखल करण्यास हिंदू पक्षासह भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने (एएसआय) विरोध दर्शवला होता.केवळ प्रकरण लांबवण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याचा युक्तीवाद दोन्ही बाजूंकडून करण्यात आला.तत्कालीन आगरा प्रांताचे वारसदार या नात्याने या प्रकरणात बाजू ऐकून घेण्याची विनंती याचिकाकर्ते महेंद्र ध्वज प्रसाद सिंह यांनी केली आहे.दक्षिण दिल्लीतील ज्या जमिनीवर कुतुब मीनार उभारण्यात आला आहे,त्या जमिनीचे वारसदार असल्याचा दावा देखील सिंह यांनी केला आहे.

गेल्या सुनावणीदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.कुतुब मीनार परिसरातील मशिद जवळपास २७ हिंदु-जैन धर्मियांचे मंदिर तोडून उभारण्यात आली असून अजूनही देवी-देवतांच्या अनेक मुर्त्या या ठिकाणी आहेत. हिंदू आणि जैन देवतांच्या मुर्तींची पुर्नप्रतिष्ठापणा करण्याची मागणी करीत पुजा करण्याची विनंती याचिकेतून करण्यात आली होती. यासंबंधी दाखल करण्यात आलेल्या याचिकेला एएसआयने विरोध दर्शवला होता. कुतुब मीनार धार्मिक स्थळ नाही,तर स्मारक आहे.स्मारकाचा दर्जा बदलता येणार नाही,अशी भूमिका न्यायालयात स्पष्ट केली होती.

हेही वाचा : 

 

 

 

Back to top button