Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना झटका; ‘ईडी’ कोठडीत पाच दिवसांची वाढ | पुढारी

Satyendra Jain : सत्येंद्र जैन यांना झटका; 'ईडी' कोठडीत पाच दिवसांची वाढ

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेत असलेले आम आदमी पक्षाचे वरिष्ठ नेते आणि दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन (Satyendra Jain)  यांच्या ईडी कोठडीत राउस एवेन्यू न्यायालयाने पाच दिवसांची वाढ केली आहे. आज (दि.९) जैन यांची कोठडी संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाकडून जैन यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली. जैन यांच्यावतीने राउस एवेन्यू न्यायालयात जामीन अर्ज देखील दाखल करण्यात आला आहे.

गुरूवारी सुनावणी दरम्यान ईडीने जैन  (Satyendra Jain) यांच्या ५ दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर, जैन यांचे वकील कपिल सिब्बल यांनी यास विरोध दर्शवला. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ३० मे रोजी त्यांना अटक केली होती. ३१ मेला जैन यांना ९ जूनपर्यंत ईडी कोठडीत रवानगी करण्यात आली होती. जैन यांची आणखी चौकशी करायची आहे, असा युक्तीवाद ईडीकडून करण्यात आला. प्रकरणाच्या तपासादरम्यान २.८५ कोटींची रोख मिळाली आहे. या पैशांसंबंधी माहिती एकत्रित करायची आहे. परंतु, ही रक्कम कुठून हस्तगत करण्यात आली आहे, याची माहिती न्यायालयाला देण्यास ईडीने नकार दिला.

या प्रकरणाचा तपास सीबीआयकडून २०१६ पासून सुरू आहे. आतापर्यंत आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. ईडीचे हे कार्यक्षेत्र नसून ते या प्रकरणात तपास करू शकत नाहीत, असा युक्तीवाद करीत सिब्बल यांनी जैन यांच्या पाच दिवसांच्या कोठडीला विरोध दर्शवला. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने जैन यांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button