‘टीआरएस’ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन | पुढारी

'टीआरएस'ला शह देण्यासाठी भाजपकडून हैदराबादमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन

नवी दिल्‍ली : पुढारी वृत्तसेवा

तेलंगणचे मुख्यमंत्री आणि टीआरएस नेते के. चंद्रशेखर राव यांनी मागील काही काळापासून भाजपवर सडकून टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर आता भाजपने टीआरएसला शह देण्‍यासाठी नियोजन केले आहे. याचाच एक भाग म्हणून 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीचे आयोजन केले आहे.

राज्‍यात पुढील वर्षी होणार विधानसभा निवडणूक

तेलंगण राज्याच्या निर्मितीत तेलंगण राष्ट्रसमिती अर्थात टीआरएसने मोठी भूमिका बजावली होती. नवीन राज्य स्थापन झाल्यापासून याठिकाणी टीआरएसचेच सरकार सत्तेत आहे. अलीकडील काळात भाजपच्या लोकप्रियतेत वाढ झाल्‍याने चंद्रशेखर राव हे भाजपवर कडवट टीका करत आहेत, असे राजकीय वर्तुळात बोलले जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी तेलंगण दौऱ्यावर असताना राव यांच्यावर कठोर शब्दांत टीका केली होती. तेलंगणमध्ये 2023 साली म्हणजे पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेत्यांचे तेलंगण दौरे वाढले आहेत, हेही लक्षात घेण्यासारखे आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक 2 आणि 3 जुलै रोजी हैदराबादमध्ये होईल. पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाचे सर्व प्रमुख नेते सामील होणार आहेत. या वर्षाच्या अखेरीस गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांवर कार्यकारिणी बैठकीत खलबते केली जाणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले. याशिवाय इतर निवडणुकांवरही यावेळी चर्चा होउ शकते.

हेही वाचा : 

 

Back to top button