

Minor Arrest In Rave Party :
तेलंगणा येथील मोईनाबाद शहरातील फार्म हाऊसवर सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर राजेंद्रनगर स्पेशल ओपरेशन टीमनं छापा टाकला. यावेळी तिथं ड्रग्स संबंधित बेकायदेशीर घडामोडी पोलिसांनी उघड केल्या. पोलिसांनी दारूच्या बाटल्या घटनास्थळावरून जप्त केल्या आहेत. त्याचबरोबर पार्टी आयोजित करणाऱ्यासह दोघाजणांनी गांजा घेतल्याचा देखील पोलिसांनी दावा केला आहे.
तेलंगणा पोलिसांनी विश्वसनीय सूत्रांकडून या रेव्ह पार्टीची माहिती मिळाली होती. त्यानंतर स्पेशल ऑपरशेन टीमनं ओक्स फार्महाऊसवर रेड टाकली. इथंच ट्रॅप हाऊस पार्टी सुरू होती. ही पार्टी कोणतीही अधिकृत परवानगी न घेता सुरू होती. या पार्टीचं प्रमोशन सोशल मीडियावरून करण्यात आलं होतं. यात अल्पवयीन मुलं दारूचं सेवन करत होते. तसेच काही अंमली पदार्थाचा देखील वापर या पार्टीत झाला असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत असं दिसून आलं आहे की, या रेव्ह पार्टीसाठी एन्ट्री फी ही एका व्यक्तीसाठी १६०० रूपये होती. तर कपल्ससाठी २८०० रूपयांची फी होती. विशेष म्हणजे या पार्टीचं आयोजन हे एका कॉलेजच्या विद्यार्थ्यानेच केलं होतं. याच विद्यार्थ्यानं यापूर्वीही अशा प्रकराच्या पार्ट्यांचं आयोजन केल्याचं समोर आलं आहे.
पोलिसांनी सांगितलं की, या प्रकरणी NDPS Act कलम २७ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर बेकायदेशीर पार्टी आयोजित केल्याचा आणि अल्पवयीन मुलांचं आयुष्य धोक्यात घातल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. अल्पवयीन मुलांच्या पालकांना कळवण्यात आल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं.
पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली असून प्रमोटर्सचं नेटवर्क आणि या पार्टीचे सप्लायर कोण आहेत याची देखील पोलीस कसून चौकशी करत आहेत.