

Electricity theft even from Mahavitaran's most advanced meters
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : महावितरण वीज चोरीवर आळा घालण्यासाठी अत्याधुनिक असे स्मार्ट मीटर बसवत आहे. यातून वीज चोरी करता येणार नसल्याचा दावा महावितरण करत होते.
दरम्यान, यातूनही मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत आहे. ऑगस्ट व सप्टेंबर या दोन महिन्यांत छत्रपती संभाजीनगर परिमंडलात तब्बल ५५ हजार ९४२ युनिटची वीज चोरी झाल्याचे उघड झाले आहे.
महावितरण वीज गळती थांबवण्यासाठी नव नवीन प्रयत्न करत आहे. यातच अत्याधुनिक असलेले स्मार्ट मीटर बसवण्याची घाई सर्वत्र दिसून येत आहे. हे मीटर फास्ट असल्याचा आरोप करत विविध संघटनांच्या वतीने याचा विरोध होत आहे, परंतु या विरोधाला न जुमानता महावितरण स्मार्ट मीटर बसवत आहे. या मीटरमधून वीज चोरीवर मोठ्या प्रमाणात आळा बसेल असा सुरूवातीपासूनच दावा करण्यात येत आहे.
असे असले तरी त्यातून मोठ्या प्रमाणात वीज चोरी होत असल्याचे अनेकदा उघड झाले आहे. वीज चोरी उघड होत आहे. अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. असे असूनही या मीटरमुळे वीज गळती थांबेल हा दावा महावितरणचा आजही आहेच. त्यामुळे या मीटरवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. हे मीटर सुरक्षित आहेत की कुणाला व्यवसाय देण्यासाठीच बदलण्यात येत आहेत अशी चर्चा सध्या जोर धरत आहे.
स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजच-ोरी वारंवार पथकांकडून तपासणी करण्यात येत आहे. या तपासणीत दोषी आढळलेल्या ग्राहकांकडून दंडासहीत बिलाची रक्कम वसूल करण्यात येत आहे. तर जो ग्राहक दंडासहित बील भरणार नाही त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहे. या दोन महिन्यांत परिमंडलातील ६५ ग्राहकांवर विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.