

Crime News Indian man shot dead in US :
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तींवर हल्ल्यांचं प्रमाण वाढलं आहे. नुकतेच अमेरिकेतील पीटर्सबर्ग येथील एक भारतीय वंशाच्या मोटेल मालकाला भर दुपारी गोळी घालून ठार करण्यात आलं. एका गुन्हेगारानं त्यांना पॉईंट ब्लँक रेंजवरून डोक्यात गोळी घातली.
हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव हे राकेश एहागाबन असं आहे. त्यांचं वय ५१ वर्षे होतं. ते पीटर्सबर्ग येथील रॉबिन्सन टाऊनशिपमध्ये एक मोटेल चालवत होते. त्यांना आपल्या मोटेलच्या पार्किंगमध्ये काही व्यक्ती भांडत असतानाचा आवाज आला. त्यानंतर ते बाहेर गेले त्याचवेळी आरोपीनं त्यांच्या डोक्यात गोळी घातली.
स्थानिक माध्यामांनी दिलेल्या वृत्तानुसार पोलीसांनी या घटनेबाबत माहिती दिली. पोलीसांच्या माहितीनुसार, मोटेल मालक राकेश यांना ३७ वर्षाच्या स्टेनलीनं गोळी मारली. ही घटना घडण्यापूर्वी तो मोटेलच्या पार्किंगमध्ये एका महिलेसोबत भांडत होता. हे भांडण पाहून मोटेल मालक भांडण सोडवण्यासाठी गेला. त्यावेळी राकेश यांनी स्टेनलीला तू ठीक आहेस का मित्रा.. असं विचारलं. त्यानंतर स्टेनलीनं राकेश यांच्या जवळ येत त्यांच्या डोक्यात गोळी घातली.
पोलिसांनी सांगितलं की ही सर्व घटना राकेश यांनी बसवलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. काही आठवड्यापूर्वीच डल्लासमध्ये ५० वर्षाच्या एका भारतीय व्यक्ती चंद्रमौली नागमल्लैया यांची त्यांची पत्नी आणि मुलासमोर हत्या करण्यात आली होती. त्यावेळी तुटलेल्या वॉशिंग मशिनवरून वाद झाला होता. आरोपीनं चंद्रमौली यांचा गळा कापला होता.
मोटेल मालक राकेश यांचा खून केल्यानंतर स्टेनली पीटर्सबर्ग इथल्या इस्ट हिल्स भागात असल्याचं पोलिसांना कळालं. त्यानंतर पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले. त्यावेळी स्टेनलीनं पोलिसांवर देखील गोळीबार केला. यात पोलीस अधिकारी देखील जखमी झाला. त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केला. यात स्टेनली जखमी झाला. त्यानंतर त्याला देखील रूग्णालयात नेण्यात आलं.