लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात असलेल्या जुनैदकडे15 फेसबुक, ७ व्हॉट्सअ‍ॅप खाती, अन् ११ सिमकार्ड | पुढारी

लष्कर-ए-तोयबाच्या संपर्कात असलेल्या जुनैदकडे15 फेसबुक, ७ व्हॉट्सअ‍ॅप खाती, अन् ११ सिमकार्ड

पुणे : पुढारी वृत्तसेवा

लष्कर-ए-तोयबा संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) दापोडीतून अटक केलेल्या मोहम्मद जुनैद मोहम्मद अता याची 15 फेसबुक, 7 सात व्हॉट्सअ‍ॅप खाती असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपासादरम्यान त्याच्याकडून 11 सिमकार्डही सापडली. सोशल मीडियावरील या खात्यांमध्ये शेकडो लोक सहभागी असून, त्यांच्याकडे तपास करावयाचा आहे, अशी माहिती एटीएसने न्यायालयात दिली आहे.

याप्रकरणात, त्याचा साथीदार आफताब हुसैन अब्दुल जब्बार शाह (वय 28, रा. किश्तवार, जम्मू आणि काश्मीर) याला काश्मीर येथून अटक करण्यात आली आहे. जुनैद याच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने दोघांनाही विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने जुनैद याला सात जूनपर्यंत तर आफताब याला 14 जून पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. आफताब हा जुनैद आणि लष्करे तोयबा यांच्यातील महत्त्वाचा दुवा असल्याचा पोलिसांना संशय आहे.

जुनैदला मागच्या महिन्यात अटक केल्यानंतर एटीएसच्या पथकांनी कारगिल, गंधरबल, श्रीनगर परिसरातील विविध ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या समन्वयाने शोध मोहीम राबवली. या तपास पथकाने श्रीनगरपासून 291 किलोमीटर अंतरावर असलेल्या किश्तवार या ठिकाणी आफताबला ताब्यात घेतले. दरम्यान, दोघांना शिवाजीनगर येथील न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी पक्षाच्या वतीने युक्तिवाद करताना विशेष सरकारी वकील विजय फरगडे यांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडी सुनावली. एटीएसचे सहायक पोलिस आयुक्त अरुण वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली एटीएसच्या निरीक्षक मंजूषा भोसले तपास करीत आहेत.

हेही वाचा 

सीना पूररेषा फेर सर्वेक्षणाला मंत्री बच्चू कडू यांनी दिली मंजुरी

अंबरनाथ फिल्म फेस्टिव्हलमध्ये ऊर्मिला जगतापला उत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार

टेंभू योजना : घोड्यावर कुणाला बसवायचे हे जनताच ठरवते; आमदार बाबर यांंनी विरोधकांना फटकारले

Back to top button