Hyderabad minor girl rape case | हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांचा गँगरेप, तिघांना अटक, सर्वजण राजकीय घराण्यातील? | पुढारी

Hyderabad minor girl rape case | हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर ५ तरुणांचा गँगरेप, तिघांना अटक, सर्वजण राजकीय घराण्यातील?

हैदराबाद; पुढारी ऑनलाईन

चालत्या कारमध्ये १७ वर्षीय मुलीवर झालेल्या गँगरेपच्या घटनेने हैदराबाद (Hyderabad minor girl rape case) हादरले आहे. या प्रकरणी ५ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन अल्पवयीन आणि दोन १८ वर्षीय मुलांचा समावेश आहे. ही पाचही मुले राजकीय घराण्याशी संबंधित आहेत. दरम्यान, या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

या पाचही जणांवर विनयभंगाचा गुन्हा सुरुवातीला दाखल करण्यात आला होता. पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या जबानीत तिच्यावर गँगरेप झाल्याचा आरोप केला. त्यानंतर संशयितांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील एका १८ वर्षीय संशयित मुलाला शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. अन्य अल्पवयीन संशयितांची ओळख पटली आहे. पण त्यांना ताब्यात घेतलेले नसल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

२८ मे रोजी उच्चभ्रू ज्युबली हिल्स भागातील एका पबमधून अल्पवयीन मुलीला संशयितांनी बाहेर नेले आणि बंजारा हिल्स येथील एका निर्जनस्थळी पार्क केलेल्या कारमध्ये तिच्यावर गँगरेप केला. पोलिसांनी ३१ मे रोजी मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोक्सो कायद्यातर्गंत गुन्हा दाखल केला.

पोलीस संशयितांचा शोध घेत असताना भाजप कार्यकर्त्यांनी शहर पोलिस स्थानकावर धडक दिली होती. त्यांनी पोलिस अधिकारी आरोपींना संरक्षण देत असल्याचा आरोप केला होता. संशयित हे टीआरएस आणि एमआयएमच्या नेत्यांच्या जवळचे असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

पोलिस सुत्रांकडून माहितीनुसार, संशयित तरुण हे ११ वी आणि १२ वी शिकणारे विद्यार्थी आहेत. ते राजकीय घराण्यांशी संबंधित आहेत. अशीही माहिती समोर आली आहे की संशयित मुलांच्या गटात एका आमदाराच्या मुलाचा समावेश आहे. पण त्याचा गँगरेपमध्ये सहभाग असण्याची शक्यता कमी आहे.

शनिवारी रात्री पीडीत मुलगी आपल्या मित्रांसमवेत पबमध्ये गेली होती. तेथून लगेच बाहेर पडली. मुलांचा एक गट एका पेस्ट्री दुकानावर गेला होता. त्यानंतर गँगरेपची घटना घडली. जेव्हा मुलीच्या घरच्यांना तिच्या मानेवर जखमा आढळून आल्या तेव्हा तिने पार्टीनंतर काही मुलांनी तिच्यावर हल्ला केल्याचे सांगितले. (Hyderabad minor girl rape case)

पोलिसांना तपासादरम्यान असे आढळून आले की मुलगी तिच्या शेजाऱ्याच्या निमंत्रणावरून पबमध्ये पार्टीला गेली होती. पीडितेच्या वडिलांनी एफआयआरमध्ये शेजाऱ्याच्या नावाचा उल्लेख केला आहे. पोलिसांनी सदर मुलाला नेऊन चौकशी केली असता त्याने, पार्टी संपल्यानंतर ती पबमध्ये दिसली नसल्याचे सांगितले. जेव्हा त्याने तिला कॉल केला तेव्हा तिने उत्तर दिले की मी त्याच्याशी नंतर बोलेन.
पोलिसांनी २८ मे रोजीच्या सायंकाळचे पबच्या आजूबाजूच्या विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळवले आहे. त्यात पीडित मुलगी पबमध्ये मर्सिडीज बेंझमध्ये बसून जाताना आणि नंतर बंजारा हिल्समधील बेकरीकडे जात असल्याचे दिसते. सायंकाळी ६.३० च्या सुमारास हे तरुण बेकरीतून बाहेर पडले आणि तरुणी तरुणांसोबत इनोव्हामध्ये बसली. इनोव्हामध्ये असलेल्या एका आमदाराचा मुलगा बेकरीजवळ उतरला आणि पोलिसांनी दावा केला आहे की तो गँगरेप करणाऱ्या मुलांच्या गटात नव्हता.

पोलिसांनी बंजारा हिल्समधील एका महिलेच्या नावाने नोंदणीकृत असलेल्या बेंझ कारची ओळख पटवली आहे. पण ज्या इनोव्हामध्ये गँगरेप झाला त्या इनोव्हाचा शोध अद्याप लागलेला नाही.

टीआरएस आणि एमआयएमचा आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, भाजपचा आरोप

तेलंगणाचे गृहमंत्री महमूद अली यांच्या नातवाच्या बॅचलर पार्टीला उपस्थित राहिल्यानंतर तरुणीवर गँगरेप झाल्याचा दावा भाजपने केला आहे. तर पश्चिम विभागाचे डीसीपी जोएल डेव्हिस यांनी हा आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे. पत्रकार परिषदेत दुब्बकचे आमदार एम रघुनंदन राव यांनी म्हटले आहे की, “हा एक घृणास्पद गुन्हा आहे. टीआरएस आणि एमआयएम आरोपींना वाचवण्यासाठी एकत्र काम करत आहेत.” या प्रकरणाची चौकशी पूर्ण होईपर्यंत महमूद अली यांना मंत्रीपदावरून हटवावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Back to top button