

पुढारी ऑनलाईन डेस्क
Monsoon Update : नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनने कर्नाटकातील कारवार पर्यंत धडक मारली आहे. यामुळे तो उद्यापर्यंत तळकोकणात पोहण्याची शक्यता आहे. तसेच तो ईशान्य भारताचा काही भाग, बंगालच्या उपसागराच्या काही भागात दाखल झाला आहे. मान्सून पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी आज विजांच्या कडकडाटात पाऊस पडेल. या भागांत सोसाट्याचा वारादेखील वाहण्याची अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
मान्सून वायव्य दिशेकडील बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि पूर्वमध्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात तसेच मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या बहुतांश भागातून पुढे सरकला असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
पुढील २ दिवसांत मान्सून मध्य आणि उत्तरेकडील बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागात, ईशान्येतील राज्यांच्या उर्वरित भागात तसेच पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांमध्ये पुढे सरकरण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
आसाम, मेघालयात पुढील २ ते ४ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणामध्ये हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
अनुकूल स्थितीचा प्रभाव वाढल्यामुळे मान्सूनचा (Monsoon Update) प्रवास आणखी सुकर झाला आहे. यामुळे तो कोणत्याही क्षणी गोव्यात पोहोचण्याची शक्यता आहे.