दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश नाकारणे ‘इंडिगो’ला पडले महागात, ‘डीजीसीए’कडून ५ लाखांचा दंड! | पुढारी

दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश नाकारणे 'इंडिगो'ला पडले महागात, 'डीजीसीए'कडून ५ लाखांचा दंड!

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

मुलाचे वर्तन सामान्य नसल्याचे कारण देत एका दिव्यांग मुलाला (specially-abled child) विमानात प्रवेश नाकारणे इंडिगो एअरलाइन्सला (IndiGo) महागात पडले आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) इंडिगोला ५ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अनेकदा विशेष गरज असलेल्या मुलांना मंद, चंचल असे समजून त्यांना अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. असाच प्रकार रांची विमानतळावर ७ मे रोजी घडला होता. एका विशेष मुलाला (दिव्यांग) त्याचे वर्तन सामान्य नसल्याचे कारण देत इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह पालकांना विमानात प्रवेश नाकारला होता.

DGCAने या प्रकरणाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी तीन त्रिसदस्यीय समिती स्थापन केली होती. समितीच्या निष्कर्षांच्या आधारे, DGCA ने इंडिगोला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यांनी वैयक्तिक सुनावणीदेखील घेतली आणि इंडिगोला लेखी खुलासा देण्याची संधी दिली होती. या प्रकरणी चौकशीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीजीसीएने निष्कर्ष काढला आहे की “इंडिगोच्या ग्राउंड स्टाफने दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश देण्याबाबत परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही आणि यामुळे गोंधळ निर्माण झाला.”

“कर्मचाऱ्याने विमानात प्रवेशावेळी निर्माण झालेली गोंधळाची परिस्थिती शांतपणे हाताळली असती तर मुलगा शांत झाला असता. पण एअरलाइन कर्मचारी तेथील परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरले.” असे DGCA ने जारी केलेल्या निवेदनात नमूद केले आहे. एकूण हे प्रकरण पाहता विमान नियमांच्या तरतुदींनुसार संबंधित विमान कंपनीला ५ लाख रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय घेतला आहे, असे DGCA ने स्पष्ट केले आहे.

DGCA ने असेही म्हटले आहे की आम्ही आमच्या नियमनाचा पुनर्विचार करु आणि यासारखी पुन्हा परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून योग्यवेळी आवश्यक बदल घडवून आणू. अशा प्रवाशांना विमानात बसण्यास परवानगी देण्याबाबत विमानतळावरील डॉक्टरांशी तसेच विमान कमांडर यांच्याशी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबाबत लेखी सल्लामसलत करणे अनिवार्य असेल.

७ मे रोजी रांची विमानतळावर इंडिगोच्या (IndiGo) व्यवस्थापकाने दिव्यांग मुलाला विमानात प्रवेश नाकारला होता. त्यावेळी इंडिगोच्या कर्मचार्‍याने असा दावा केला होती की ते मूल इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे आणि प्रवासासाठी योग्य ठरवण्याआधी त्याला सामान्य व्हावे लागेल.

रांची विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. ”एअरलाइन्सकडून विशेष गरज असलेल्या मुलाला प्रवेश नाकारला जातो. इंडिगोच्या कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीचा अभाव दिसतो.” अशी कॅप्शन देत या घटनेच्या एका प्रत्यक्षदर्शीने व्हिडिओ पोस्ट केला होता. इंडिगोच्या कर्मचाऱ्याने मुलाच्या स्थितीची तुलना मद्यधुंद व्यक्तीशी करत त्याला विमानात प्रवेश नाकारला. शेवटी, मुलाला आणि त्यांच्या पालकांना विमानतळावरच सोडून विमान हैदराबादला रवाना झाले होते.

Back to top button