दिव्यांग मुलाला इंडिगो विमानात प्रवेश नाकारला, म्हणे मुलाचे वर्तन सामान्य नाही! (पहा व्हिडिओ)

दिव्यांग मुलाला इंडिगो विमानात प्रवेश नाकारला, म्हणे मुलाचे वर्तन सामान्य नाही! (पहा व्हिडिओ)

पुढारी ऑनलाईन डेस्क

अनेकदा विशेष गरज असलेल्या मुलांना मंद, चंचल असे समजून त्यांना अनेक ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. असाच प्रकार रांची विमानतळावर घडला आहे. एका विशेष मुलाला (दिव्यांग) त्याचे वर्तन सामान्य नसल्याचे कारण देत इंडिगो एअरलाइन्सच्या कर्मचाऱ्यांनी त्याच्यासह पालकांना विमानात प्रवेश नाकारला.

इंडिगोच्या कर्मचार्‍यांनी असेही जाहीर केले हे मूल इतर प्रवाशांसाठी धोकादायक आहे आणि प्रवासासाठी योग्य ठरवण्याआधी त्याला सामान्य व्हावे लागेल. दरम्यान, या विमानात एक डॉक्टर होते. आम्ही त्याची मदत करु असे त्यांनी आश्वासन दिले. तरीही इंडिगोच्या कर्मचाऱ्यांना विशेष मुलासह त्यांच्या संबंधित पालकांना विमानतळावरच ठेवून विमान हैदराबादकडे रवाना केले.

रांची विमानतळावर घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. "एअरलाइन्सकडून विशेष गरज असलेल्या मुलाला प्रवेश नाकारला जातो. इंडिगोच्या कर्मचार्‍यांमध्ये सहानुभूतीचा अभाव दिसतो. हे पहिल्यांदा असे घडलेले नाही. इंडिगो लवकरच या प्रकरणी निवेदन जारी करणार आहे." अशी कॅप्शन देत हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

विमानतळावरील एका प्रवाशाने सोशल मीडिया पोस्टद्वारे ही घटना उघडकीस आणली. जो दुसर्‍या विमानाची वाट पाहत होता. व्हिडिओत विमानतळावरील अनेक प्रवासी इंडिगोच्या कर्मचार्‍यांशी वाद घालताना दिसत आहेत. यावेळी विशेष मुलगा व्हीलचेअरवर बसलेला दिसत आहे.

इंडिगो एअरलाइन्सने त्या मुलाला रांची विमानतळावर विमानात चढण्यापासून रोखल्यामुळे तो नाराज दिसत होता. या घटनेची गंभीर दखल घेत नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) चौकशी सुरु केली आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news