पणजी; मनाली प्रभुगावकर : केरळमध्ये सामान्यत: १ जून रोजी मान्सूनचे आगमन होते. त्यानंतर मान्सूनच्या पुढील प्रवासाच्या तारखा ठराविक असतात. भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) नवीन निकषांप्रमाणे, मान्सून वेगवेगळ्या भारतीय उपखंडात ८ जुलैपर्यंत पोहोचतो, म्हणजेच मान्सूनला केरळमध्ये दाखल झाल्यानंतर देशभरात पसरायला सरासरी ३८ दिवस लागतात. गेल्या २ दशकात २००२ साली मान्सूनला देशभरात पोहोचण्यासाठी सर्वाधिक ७८ दिवस लागले होते, अशी माहिती वीस वर्षांच्या आकडेवारीतून मिळाली आहे.
गोवा : संभाव्य बंडखोरीचे भाजपपुढे आव्हान
हवामानशास्त्रज्ञ डॉ. एम. आर. रमेश कुमार यांनी 'पुढारी' ला दिलेल्या माहितीनुसार, २००२ मध्ये मान्सूनने देशातील सर्व उपखंडांमध्ये पोचण्यासाठी तब्बल ७८ दिवस घेतले होते. त्यावर्षी मान्सून केरळमध्ये २९ मे रोजी दाखल झाला होता आणि १५ ऑगस्ट रोजी मान्सूनने देशभर व्याप्ती पूर्ण केली. गेल्या २० वर्षात २००२ मध्येच मान्सूनचा काळ सर्वाधिक म्हणजेच ऑगस्टपर्यंत लांबला होता.
दोन दशकातील आकडेवारीचा अभ्यास सांगतो, की आयएमडीच्या पूर्वीच्या निकषांप्रमाणे पावसाला संपूर्ण भारतीय उपखंडात पोहोचण्यासाठी ४५ दिवस लागत होते. यानुसार १५ जुलै पर्यंत मान्सूनचे आगमन देशभरातील सर्व ठिकाणांवर व्हायचे. मात्र, आयएमडीच्या नवीन निकषांनुसार ३८ दिवसांचा कालावधी लागतो, असे दिसून आलेले आहे.
दरम्यान, मान्सूनला जेव्हा २००२ मध्ये संपूर्ण देशात पोचायला सर्वाधिक दिवस ७८ दिवस लागले होते, त्यावर्षी गोव्यात २२७७.६ मिमी (सुमारे ९० इंच) इतका पाऊस पडला होता. तर २०१३ साली जेव्हा सर्वात कमी वेळेत मान्सून देशभरात विस्तारला होता, त्या वर्षी गोव्यात मान्सून ४ जून रोजी दाखल झाला होता. त्यावेळी (सुमारे ९६ इंच) इतक्या पावसाची नोंद झाली होती.
२०१३ मध्ये मान्सूनचा चपळ डाव :
२०१३ मध्ये सर्वात कमी वेळेत, केवळ १५ दिवसांच्या कालावधीत मान्सूनने देशभरात जम बसविला होता. त्यावर्षी अगदी वेळेत १ जून रोजी पावसाचे आगमन केरळात झाले होते. त्यानंतर १६ जून रोजी अखंड भारतात मान्सून पोहोचला होता. तसेच २००४ मध्ये अचूक २ महिन्यांनी मान्सून संबंध देशात विस्तारला होता. २००४ मध्ये १८ मे रोजी मान्सून केरळात दाखल झाला आणि ६५ दिवसांनी १८ जुलै रोजी सर्व भारतीय उपखंडांत पोहोचला होता.
वर्ष केरळमध्ये देशभर व्याप्तीचे
आगमन व्याप्ती एकूण दिवस
2001 23 मे 24 जून 32
2002 29 मे 15 ऑगस्ट 78
2003 8 जून 5 जुलै 27
2004 18 मे 18 जुलै 65
2005 5 जुन 30 जुन 25
2006 26 मे 24 जुलै 59
2007 28 मे 4 जुलै 37
2008 31 मे 10 जुलै 40
2009 23 मे 3 जुलै 41
2010 31 मे 6 जुलै 36
2011 29 मे 9 जुलै 41
2012 5 जुन 11 जुलै 36
2013 1 जुन 16 जुन 15
2014 6 जुन 17 जुलै 41
2015 5 जुन 26 जुन 21
2016 8 जुन 13 जुलै 35
2017 30 मे 19 जुलै 50
2018 29 मे 28 जुन 30
2019 1 जुन 26 जुन 25
2020 1 जुन 26 जुन 25
2021 3 जुन – –