Karnataka hijab row : कर्नाटकात पुन्हा 'हिजाब' वाद! मंगळूर विद्यापीठात स्कार्फ बंदीवरुन तणाव | पुढारी

Karnataka hijab row : कर्नाटकात पुन्हा 'हिजाब' वाद! मंगळूर विद्यापीठात स्कार्फ बंदीवरुन तणाव

मंगळूर; पुढारी ऑनलाईन

कर्नाटकात पुन्हा ‘हिजाब’ वाद (Karnataka hijab row) सुरु झाला आहे. मंगळूर विद्यापीठाने (Mangalore university) सध्याच्या गणवेश नियमात सुधारणा केली आहे. यानुसार विद्यार्थिनींना विद्यापीठाच्या संपूर्ण कॅम्पसमध्ये आणि वर्गात डोक्यावर स्कार्फ घालण्यावर बंदी घातली आहे. पण या निर्णयाला विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी जोरदार विरोध केला आहे. यामुळे विद्यापीठ कॅम्पसमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा नवा नियम येथील विद्यापीठाच्या महाविद्यालयासह सहा घटक महाविद्यालयांना लागू करण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त ‘द टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे.

याआधी महाविद्यालयांत मुस्लिम मुलींना डोक्यावर शाल पांघरण्याची परवानगी होती. दरम्यान, नुकतीच बंगळूर येथे झालेल्या विद्यापीठ सिंडिकेटच्या बैठकीनंतर हा नियम रद्द करण्यात आला. विद्यापीठाशी संलग्न असलेल्या सहा महाविद्यालयांना नवीन नियम लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

विद्यापीठ महाविद्यालयाच्या प्राचार्य अनसूया राय यांनी याबाबत म्हटले आहे की, त्यांनी मुस्लिम मुलींना सिंडिकेटच्या निर्णयाचे पालन करण्यास सांगितले आहे. “महाविद्यालयातील ४४ मुस्लिम विद्यार्थ्यांपैकी केवळ १० विद्यार्थी नियमितपणे वर्गात हजर असतात. कॅम्पसमध्ये परतण्यासाठी त्यांच्याशी अनेक वेळा चर्चा केल्या आहेत,” असे त्यांनी म्हटले आहे.

सुधारित नियम Pre-University आणि खालच्या वर्गांपुरता मर्यादित आहे. पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षणासाठी नसल्याचे मुस्लीम मुलींचे म्हणणे आहे. शैक्षणिक वर्षाच्या मध्यंतरी हा नियम लागू केला जाऊ शकत नाही. ज्यामुळे स्थिती बिघडू शकते, असा दावा त्यांनी केला आहे.

दरम्यान, विद्यापीठाच्या या निर्णयाचे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (ABVP) समर्थन केले आहे. कॅम्पसमध्ये हिजाबवर पूर्णपणे बंदी घालण्याची मागणी करत त्यांनी गुरुवारी आंदोलनही केले. कॅम्पसमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या कुलगुरूंनी व्यवस्थापनाची तातडीची बैठक बोलावली आहे.

नियमांमध्ये कोणताही बदल हा शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच केला पाहिजे. गेल्या काही दिवसांपासून कॅम्पसमध्ये कोणताही वाद नव्हता. पण आता परिस्थिती बिघडू शकते, असे विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांचे म्हणणे आहे.

जानेवारीमध्ये उडुपीतील कॉलेजमध्ये हिजाबवरून (Karnataka hijab row) वाद निर्माण झाला. कॉलेजमध्ये प्रवेश केलेल्या विद्यार्थिनींना हिजाब काढून वर्गात प्रवेश करण्यास सांगण्यात आले. पण, विद्यार्थिनींनी हिजाब काढण्यास नकार दिला. यावरून कॉलेज व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाला. काही विद्यार्थिनींनी कॉलेजबाहेर आंदोलन सुरू केले. हिजाबला विरोध करून काही विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांनी गळ्यात भगवा शेला घालून कॉलेजमध्ये प्रवेश केला. काही विद्यार्थ्यांनी निळा शेला घालून निदर्शने केली. उडुपीतील सहा विद्यार्थिनी आणि पालकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर त्रिसदस्यीय खंडपीठाने सलग ११ दिवस सुनावणी केली. १५ मार्च रोजी निकाल जाहीर करण्यात आला. शाळा, महाविद्यालयात हिजाबवर बंदी असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

Back to top button