Kapil Sibal : अखेर कपिल सिब्‍बलही काँग्रेस’मुक्‍त’, राज्‍यसभेसाठी ‘सपा’कडून उमेदवारी | पुढारी

Kapil Sibal : अखेर कपिल सिब्‍बलही काँग्रेस'मुक्‍त', राज्‍यसभेसाठी 'सपा'कडून उमेदवारी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
काँग्रेसचे निष्‍ठावंत, ज्‍येष्‍ठ नेते कपिल सिब्‍बल (  Kapil Sibal ) यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्‍ठी दिल्‍याचे आज स्‍पष्‍ट झाले. त्‍यांनी राज्‍यसभेसाठी समाजावादी पार्टीच्‍या समर्थनाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वीच सिब्‍बल यांनी काँग्रेसचे माजी अध्‍यक्ष राहुल गांधी यांच्‍या नेतृत्‍वावर सवाल उपस्‍थित केले होते. तेव्‍हापासून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्‍ठी देतील, असे मानले जात होते.

 Kapil Sibal : १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा

राज्‍यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केल्‍यानंतर बोलताना सिब्‍बल म्‍हणाले की, मी १६ मे रोजीच काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सध्‍या सिब्‍बल हे उत्तर प्रदेशमधूनच काँग्रेसचे राज्‍यसभा खासदार होते. उत्तर प्रदेशमध्‍ये काँग्रेस आमदारांची संख्‍या कमी असल्‍याने त्‍यांना या राज्‍यातून संधी मिळणेच शक्‍य नव्‍हते. सिब्‍बल यांना पुन्‍हा राज्‍यसभेवर संधी देणार का, याबाबत काँग्रेसने भूमिका स्‍पष्‍ट केली नाही. उत्तर प्रदेशमधून समाजवादी पार्टी, बिहारमधील लालूप्रसाद यादव यांच्‍या राष्‍ट्रीय जनता दल आणि झारखंड मुक्‍ती मोर्चा हे तिन्‍ही पक्षांचे सिब्‍बल यांना राज्‍यसभेसाठी निंमत्रण होते. अखेर त्‍यांनी समाजवादी पार्टीबरोबर जाण्‍याचा निर्णय घेतला.

सिब्‍बल यांनी समाजवादी पार्टीच निवड का केली?

समाजवादी पार्टीचे ज्‍येष्‍ठ नेते आझम खान यांना अंतरिम जामीन देण्‍यात विधीज्ञ असणार्‍या कपिल सिब्‍बल यांची महत्त्‍वपूर्ण भूमिका होती. जामीन मंजूर झाल्‍यानंतर आझम खान यांनी सिब्‍बल यांच्‍यावर स्‍तुतीसुमनांचा वर्षाव केला होता. अखिलेश यादव यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. सिब्‍बल यांना राज्‍यसभेवर पाठवत त्‍यांनी सिब्‍बल यांच्‍यासह आझम खान यांच्‍याबरोबर संवाद साधणारा नेताही आपल्‍या गोटात घेतला आहे, अशी शक्‍यता राजकीय विश्‍लेषक व्‍यक्‍त करत आहेत.

काँग्रेस पक्षश्रेष्‍ठींविरोधात सिब्‍बल यांचे बंड

उत्तर प्रदेशसह पाच राज्‍यांतील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा नामुष्‍कीजनक पराभव झाला. यानंतर सिब्‍बल यांनी गांधी कुटुंबीयांविरोधात बंडाचा झेंडा होती घेतला. एका मुलखातीमध्‍ये बोलताना ते म्‍हणाले होती की, “काँग्रेस एका कुटुंबाचा पक्ष नाही, तो सर्वांचा पक्ष आहे. काँग्रेस पक्षाचे अध्‍यक्ष नसतानाही राहुल गांधीच सर्व निर्णय घेतात. मात्र आता पराभवाची जबाबदारी कोणीही घेत नाही. राहुल गांधी यांच्‍या नेतृत्त्‍वाखाली काँग्रेस पक्ष अनेक निवडणुकांमध्‍ये पराभूत झाला आहे. अशा परिस्‍थितीमध्‍ये पक्षाचे नेतृत्त्‍व नवीन लोकांकडे दिले जावे”.

कपिल सिब्‍बल हे २००४ ते २०१४ या काळात मनमोहनसिंग सरकारमध्‍ये केंद्रीय मंत्री होते. तर व्‍ही. पी. सिंग यांच्‍या सरकारमध्‍ये अतिरिक्‍त सॉलिसिटर जनरल म्‍हणून त्‍यांनी काम पहिले होते. २०१६ मध्‍ये उत्तर प्रदेशमधून काँग्रेसने त्‍यांना राज्‍यसभेत पाठवले. नॅशनल हेरॉल्‍ड खटल्‍यात त्‍यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्‍या वतीने युक्‍तीवाद केला होता.

हेही वाचा: 

 

Back to top button