SpiceJet : स्पाईसजेटच्या सिस्टमवर ‘रॅन्समवेअर’चा हल्ला, विमाने उड्डाणांचा खोळंबा | पुढारी

SpiceJet : स्पाईसजेटच्या सिस्टमवर 'रॅन्समवेअर'चा हल्ला, विमाने उड्डाणांचा खोळंबा

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

स्पाईसजेट विमान कंपनीच्या सिस्टमवर मंगळवारी रात्री सायबर हल्ला झाला. यामुळे याचा फटका बुधवारी सकाळी होणाऱ्या विमान उड्डाणांवर झाला. स्पाईसजेट कंपनीच्या सिस्टमला रॅन्समवेअर व्हायरस हल्ल्याचा सामना करावा लागला. यामुळे बुधवारी सकाळी कंपनीच्या विमानांची उड्डाणे खोळंबली असल्याची माहिती SpiceJet ने ट्विट करत दिली आहे. पण कंपनीच्या आयटी टीमने सिस्टममध्ये दुरुस्ती केली आहे. यामुळे आता उड्डाणे पूर्ववत होतील, असे SpiceJet ने म्हटले आहे.

स्पाईसजेट एअरलाइन्सकडे ९१ विमानांचा ताफा आहे. यात १३ मॅक्स विमानांचा समावेश आहे. तर ४६ जुन्या व्हर्जनची ‍boeing 737 विमाने त्यांच्याकडे आहेत. रॅन्समवेअर व्हायरसमुळे संगणकाचा वापर करणे कठीण होऊन बसते. याचा फटका स्पाईसजेटला बसला आहे.

दरम्यान, एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाला (AAI) रोजचे पेमेंट करण्यात विलंब होत असल्याने स्पाईसजेटची काही उड्डाणे गेल्या आठवड्यात दिल्ली विमानतळावर काही काळ थांबवण्यात आली होती, असे सूत्रांनी म्हटले आहे.

एअरलाइन्सच्या प्रवक्त्याने दावा केला आहे की, सॉफ्टवेअरमधील त्रुटीमुळे पेमेंटला उशीर झाला होता आणि आता उड्डाणे सामान्यपणे सुरू आहेत. हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपनी स्पाईसजेटच्या ९० वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने उडविण्यास हवाई वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने याआधी मनाई केली होती. जोवर या वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने चालविण्याचे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात नाही, तोवर त्यांच्या ताब्यात ही विमाने देऊ नयेत. या वैमानिकांना सदर विमानाचे सिम्युलेटर प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही डीजीसीएने याआधी जारी केलेल्या आदेशात म्हटले होते.

Back to top button