SpiceJet : स्पाईसजेटच्या ९० वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने उडविण्यास मनाई | पुढारी

SpiceJet : स्पाईसजेटच्या ९० वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने उडविण्यास मनाई

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : हवाई वाहतूक क्षेत्रातील कंपनी स्पाईसजेटच्या ९० वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने उडविण्यास हवाई वाहतूक महासंचालनालय अर्थात डीजीसीएने मनाई केली आहे. जोवर या वैमानिकांना बोईंग ७३७ मॅक्स विमाने चालविण्याचे आवश्यक ते प्रशिक्षण दिले जात नाही, तोवर त्यांच्या ताब्यात ही विमाने देऊ नयेत. (SpiceJet)

या वैमानिकांना सदर विमानाचे सिम्युलेटर प्रशिक्षण देणे गरजेचे असल्याचेही डीजीसीएने आपल्या आदेशात म्हटले आहे. मनाई करण्यात आलेले वैमानिक बोईंग ७३७ मॅक्स विमाने चालविताना आढळले तर कठोरातील कठोर कारवाई केली जाईल, असे डीजीसीएचे संचालक अरुण कुमार यांनी आदेशात म्हटले आहे.

बोईंगची इतर प्रकाराची विमाने चालविण्यास या वैमानिकांना परवानगी देण्यात आलेली आहेत. स्पाईसजेटच्या सेवेत सध्या ६५० वैमानिक आहेत. भारतात केवळ स्पाईसजेटकडून बोईंग ७३७ मॅक्स विमाने चालविली जातात. कंपनीकडे या प्रकाराची ११ विमाने आहेत. (SpiceJet)

शेअर बाजारातील मोठे तज्ज्ञ अशी ख्याती प्राप्त केलेले राकेश झुनझुनवाला लवकरच आकाश एअर नावाची विमान कंपनी सुरु करणार आहेत. या कंपनीने ७२ बोईंग ७३७ मॅक्स विमानांसाठी ऑर्डर दिलेली आहे, हे विशेष.

Back to top button