साखर निर्यातीत विक्रमी वाढ! चालु आर्थिक वर्षात ७५ लाख मेट्रिक टन निर्यात | पुढारी

साखर निर्यातीत विक्रमी वाढ! चालु आर्थिक वर्षात ७५ लाख मेट्रिक टन निर्यात

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशातून चालु आर्थिक वर्षात ९० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे १८ मे पर्यंत  ७५ लाख मेट्रिक टन साखरेची निर्यात करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. २०१७-१८ मध्ये निर्यात करण्यात आलेल्या ६.२ लाख मेट्रिक टनच्या तुलनेत हे प्रमाण १५ पटीने अधिक आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये साखर निर्यातीचा आलेख बराच उंचावला आहे.

केंद्रीय ग्राहक, अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाच्या आकडेवारीनूसार २०१८-१९ मध्ये ३८ लाख मॅट्रिक टन, २०१९-२० मध्ये ५९.६ लाख मॅट्रिक टन आणि २०२०-२१ मध्ये ७० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यात आली. चालु आर्थिक वर्षात ३५५ लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन घेण्यात आले आहे. गतवर्षी हे प्रमाण ३१० लाख मॅट्रिक टन एवढे होते. इंडोनेशिया, अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, संयुक्त अरब अमिराती, मलेशिया आणि आफ्रिकन देश हे साखरेची आयात करणारे देश आहेत.

साखरेची निर्यात सुलभ करण्यासाठी गेल्या ५ वर्षांमध्ये साखर कारखान्यांना जवळपास १४,४५६ कोटी तर, बफर साठ्यासाठी वहन खर्च म्हणून २ हजार कोटी रुपये जारी करण्यात आले. साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमती चढ्या व स्थिर असल्याने, चालू साखर हंगाम २०२१-२२ मध्ये साखर निर्यात करण्यासाठी सुमारे ९० लाख मेट्रिक टन च्या निर्यातीचे करार करण्यात आले आहेत.

२०१४ पर्यंत, मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजची इथेनॉल डिस्टिलेशन क्षमता केवळ २१५ कोटी लिटर होती. गेल्या ८ वर्षांत मोलॅसिस-आधारित डिस्टिलरीजची क्षमता ५६९ कोटी लिटरपर्यंत वाढली आहे. २०१४ मध्ये २०६ कोटी लीटर असलेली धान्य-आधारित डिस्टिलरीजची क्षमता वाढून २९८ कोटी लीटर झाली आहे. अशा प्रकारे, एकूण इथेनॉल उत्पादन क्षमता केवळ ८ वर्षांत ४२१ कोटी लीटरवरून ८६७ कोटी लीटरपर्यंत वाढल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button