

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमने भारतातील बडे राजकीय नेते, मोठे व्यापारी आणि भारतातील अन्य प्रतिष्ठित व्यक्तींवर हल्ले करून भारतात हाहाकार उडवण्यासाठी एका विशेष युनिटची स्थापना केली आहे. मुख्यत्वेकरून मुंबई आणि दिल्लीमध्ये स्फोटकांचा वापर करून असे हल्ले होण्याची शक्यता असल्याचे एनआयएच्या सूत्रांनी सांगितले.
या हल्ल्यांसाठी लागणारा शस्त्रसाठा, स्फोटके आणि अन्य साहित्य दाऊदकडून पुरविण्यात येत असल्याची पक्की खबर लागल्याने 'एनआयए' त्या मागावर शोध घेत आहे. या शोधमोहिमेचा भाग म्हणून 'एनआयए'च्या पथकांनी सोमवारी ही कारवाई केली.
डी गँगविरुद्ध धडक मोहीम
छोटा शकीलचा नातेवाईक असलेला सलीम कुरेशी उर्फ सलीम फ्रूट हा बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने अनेक वेळा दुबईमार्गे पाकिस्तानात गेल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. तो दाऊद आणि शकीलच्या सांगण्यावरून डी कंपनीची मुंबईतील कामे करत असल्याचीही खात्री झाली आहे. खंडणी, सेटलमेंट आणि ड्रग्ज तस्करीच्या माध्यमातून गोळा केलेला पैसा हवाला मार्गे दहशतवादी संघटनांना पुरवला जात असल्याने केंद्रीय यंत्रणांनी दाऊद टोळीविरुद्ध मोठी मोहीमच हाती घेतलेली दिसते.
खंडवानीच्या चौकशीने खळबळ
सुहेल खंडवानी याचा खांडवानी समूह बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहे. तो माहीम आणि हाजीअली दर्ग्याचे विश्वस्त असल्याने मुस्लिम समाजात प्रतिष्ठा बाळगून आहे. खंडवानी 1993 च्या बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी टायगर मेमनचा साथीदार राहिला. नोव्हेंबर 1994 मध्ये याच खंडवानीकडून 44 लाख रुपये आणि मे 1995 मध्ये गोव्याच्या तत्कालीन उद्योगमंत्र्यांनी खांडवानीला दिलेले 60 लाख रुपये जप्त केले होते. त्यानंतर आता एनआयएने खंडवानीच्या मालमत्तांवर छापे टाकून त्याला ताब्यात घेतल्याने एकच खळबळ उडाली आहे.