Weather Forecast | मान्सूनची वेगाने वाटचाल! कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह १९ जिल्ह्यांत ‘यलो अलर्ट’ जारी | पुढारी

Weather Forecast | मान्सूनची वेगाने वाटचाल! कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह १९ जिल्ह्यांत 'यलो अलर्ट' जारी

पुढारी ऑनलाईन डेस्क

Weather Forecast : सोमवारी अंदमानात दाखल झालेल्या मान्सूनची (Southwest Monsoon) पुढील वाटचाल वेगाने सुरु आहे. मान्सून दक्षिण बंगाल उपसागराच्या आणखी काही भागात, संपूर्ण अंदमान समुद्र, अंदमान आणि निकोबार बेटे तसेच पूर्वेकडील बंगाल उपसागराच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. दरम्यान, केरळ आणि कर्नाटकच्या किनारी आणि दक्षिणेकडील अंतर्गत भागात पुढील २ दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

दरम्यान, पुढील ४, ५ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

गेल्या २४ तासांत केरळ, मेघालयातील काही भागांत मुसळधार ते अतिवष्टी झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. १९ मे रोजी अमरावती, अकोला, वाशीम, यवतमाळ, हिंगोली, परभणी, नांदेड, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड या १९ जिल्ह्यांत यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. हवामानाच्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्यासाठी येलो अलर्ट जारी केला जातो. (Weather Forecast)

अंदमान- निकोबार बेट, आसाम, कर्नाटकचा दक्षिणेकडील अंतर्गत भाग, तामिळनाडूतील काही भागात गेल्या २४ तासांत मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा आणि रायलसीमा या ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे.

मान्सूनची आगेकूच सुरूच आहे. त्याने अंदमान-निकोबारला चिंब भिजवत तो आता केरळच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. मान्सून अंदमान व बंगालच्या उपसागरात सोमवारी दाखल झाला होता. २४ तासांतच त्याने अंदमान, निकोबार आणि उर्वरित सर्व बेटे काबीज केली.

Back to top button