Buy wheat : ३१ मेपर्यंत गहू खरेदी सुरु ठेवण्याचे केंद्राचे निर्देश | पुढारी

Buy wheat : ३१ मेपर्यंत गहू खरेदी सुरु ठेवण्याचे केंद्राचे निर्देश

नवी दिल्ली ; पुढारी वृत्तसेवा : यंदा गहू खरेदीत घट होण्याची शक्यता लक्षात घेता केंद्र सरकारने गहू खरेदी हंगामात वाढ केली आहे. राज्य, केंद्रशासित प्रदेश तसेच भारतीय अन्न महामंडळाला ३१ मेपर्यंत गहू खरेदी  (Buy wheat ) सुरु ठेवण्याचे निर्देश केंद्राकडून देण्यात आले आहेत. अन्न आणि सार्वजनिक पुरवठा आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने भारतीय अन्न महामंडळाला केंद्रीय साठ्याअंतर्गत गहू खरेदी सुरू ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढीव कालावधीमुळे शेतकऱ्यांना फायदा होईल, असा विश्वास केंद्राने व्यक्त केला आहे.

दरम्यान, मध्य प्रदेश, हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, गुजरात, बिहार आणि राजस्थान या राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांमध्ये रब्बी विपणन हंगाम २०२२-२३ मध्ये केंद्रीय साठ्या अंतर्गत गव्हाची खरेदी  (Buy wheat) सुरळीतपणे सुरू आहे.

मुख्यत्वे किमान हमीभावापेक्षा जास्त बाजारभावामुळे मागील रब्बी विपणन हंगाम २०२१-२२ च्या तुलनेत रब्बी विपणन हंगाम २०२२-२३ दरम्यान केंद्रीय साठ्या अंतर्गत गहू खरेदी कमी झाली आहे. ज्यामध्ये शेतकरी खासगी व्यापार्‍यांना गहू विकत आहेत. केंद्र सरकारने १३ मेरोजी गव्हाच्या चढ्या किंमतीला लगाम घालण्यासाठी अपरिवर्तनीय पत हमी पत्रे आणि शेजारील, अन्नधान्य तुटवडा असलेल्या देशांच्या विनंती वगळता गहू निर्यात प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला होता.

विशेष म्हणजे १४ मेपर्यंत ३६ हजार २०८ कोटी रुपये मूल्याच्या किमान हमीभावासह १८० लाख मेट्रिक टन गव्हाची खरेदी करण्यात आली असून, जवळपास १६.८३ लाख शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाल्याचे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button