UP Madarsa : आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार | पुढारी

UP Madarsa : आता उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत होणार

लखनऊ; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील सर्व मदरशांमध्ये (UP Madarsa) राष्ट्रगीत होणार आहे. यूपीच्या शिक्षण मंडळाने हा आदेश जारी केला आहे. उत्तर प्रदेश मदरसा शिक्षण मंडळाचे रजिस्ट्रार एसएन पांडे यांनी ९ मे रोजी सर्व जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आदेश जारी केला होता.

सर्व मदरशांमध्ये आता राष्ट्रगीत (जन गण मन) गाणे बंधनकारक करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी गुरुवारी दिली. २४ मार्च रोजी झालेल्या बोर्डाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. यामध्ये नमाजाच्या वेळी सर्व मदरशांमध्ये (UP Madarsa) राष्ट्रगीत गाणे अनिवार्य करण्याचा निर्णय घेण्यात आला. ते म्हणाले की रमजाननंतर १२ मेपासून सर्व मदरशांमध्ये नियमित वर्ग सुरू झाले होते आणि त्याच दिवसापासून हा आदेश लागू झाला.

आदेशात असे म्हटले आहे की वर्ग सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून राष्ट्रगीत गायले जाईल, हे सर्व मान्यताप्राप्त, आर्थिक अनुदानित आणि बिगर आर्थिक अनुदानित मदरशांमध्ये लागू असेल. आदेशाचे पालन करण्याच्या सूचना जिल्हा अल्पसंख्याक कल्याण अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भाजप नेते मोहसीन रझा यांनीही त्याचे स्वागत केले आहे. यामुळे मुलांमध्ये देशाप्रती प्रेम वाढेल, असे रझा यांनी सांगितले. शिस्त आणि देशभक्ती शिकवेल.

शिक्षक संघ मदारीस अरबियाचे सरचिटणीस दिवाण साहेब जमान खान म्हणाले, “आतापर्यंत मदरशांमध्ये वर्ग सुरू होण्यापूर्वी फक्त हमद (अल्लाहला) आणि सलाम (प्रेषित मुहम्मद यांना सलाम) गायले जात होते. काही मदरशांमध्ये राष्ट्रगीत गायले जात होते, पण ते सक्तीचे नव्हते, जे आता सक्तीचे करण्यात आले आहे.

हा आदेश उत्तर प्रदेशचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री धरमपाल सिंह यांच्या विधानानंतर आला आहे, ज्यात त्यांनी मदरशांमध्ये राष्ट्रवाद धडा शिकवण्याबाबत सुतोवाच केले होते. राज्यमंत्री दानिश आझाद यांनीही म्हटले होते की, मदरशातील विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीने भरलेले असावे अशी सरकारची इच्छा आहे. सध्या यूपीमध्ये १६ हजार ६४१ मदरसे आहेत, त्यापैकी ५६० मदरसे आर्थिक अनुदान घेतात.

हे ही वाचलं का ?

Back to top button