राज ठाकरेंना खुली धमकी देणारे ब्रिजभूषण सिंह आहेत तरी कोण? | पुढारी

राज ठाकरेंना खुली धमकी देणारे ब्रिजभूषण सिंह आहेत तरी कोण?

पुढारी ऑनलाईन डेस्क : “उत्तर भारतीयांना शिवीगाळ करणारा आणि त्यांना मारहाण करणाऱ्या राज ठाकरेंनी अयोध्या दौऱ्याआधी माफी मागितली नाही तर उत्तर प्रदेशात घुसू देणार नाही”, अशी धमकी देणारे भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह बाबरी मशीद पाडणाऱ्या आरोपींपैकी एक होते. त्यांना तुरुंगावासही झाला होता. त्यावेळी अटल बिहारी वायपेयी यांनी पत्रही पाठवलं होतं. तीन वेळा खासदार झाल्याने भाजपमध्ये त्यांना एक वेगळं स्थान आहे,

हे ब्रिजभूषण सिंह कोण आहेत, यासंदर्भात थोडक्यात जाणून घेऊ…

ब्रिजभूषण शरण सिंह यांचा जन्म ८ जानेवारी १९५६ रोजी झाला आहे. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील विश्नोहरपूरमध्ये झाला. सुरूवातीपासूनच ते भाजपमध्ये कार्यरत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे.

जगदंबा शरण सिंह असे त्यांच्या वडिलांचे, तर प्यारी देवी सिंह असे ब्रिजभूषण सिंह यांच्या आईचे नाव आहे. त्यांचा केतकी देवी सिंह यांच्याशी त्यांचा विवाह झालेला असून, त्यांना २ मुले आणि १ मुलगी आहे.

ब्रिजभूषण सिंह यांनी सर्वात पहिल्यांदा १९९१ मध्ये निवडणूक लढवली होती. त्यांनी पहिल्यांदा गोंडा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकली होती. मात्र, याच मतदारसंघातून १२ व्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा समाजवादी पक्षाचे नेते कीर्ती वर्धन सिंह यांनी पराभव केला होता.

ब्रिजभूषण सिंह यांनी पुन्हा १९९९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली आणि प्रतिस्पर्धी उमेदवार कीर्ती वर्धन सिंह यांचा पराभव करत लोकसभेत पाऊल ठेवले होते.

ब्रिजभूषण शरण सिंह उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातून खासदार आहेत. ते या मतदारसंघातून तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००८ मध्ये ते भाजपतून समाजवादी पक्षात गेले होते.

त्यांनंतर त्यांनी २००९ मध्ये बसपाच्या सुरेंद्र नाथ अवस्थी यांचा ७२,१९९ मतांनी पराभूत केले होते. त्यांनतर १६ व्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी पुन्हा भाजपत प्रवेश केला. २०१४ आणि २०१९ मध्येही ते विजयी झाले आहेत. ब्रिजभूषण शरण सिंह हे अखिल भारतीय कुस्ती संघटनेचे अध्यक्षही आहेत.

पहा व्हिडीओ : राज ठाकरेंची औरंगाबादमधील सभा थोडक्यात

हे वाचलंत का? 

Back to top button