कालीचरण महाराज : "भारतात फक्त सनातन धर्मच आहे; ख्रिश्चन-इस्लाम धर्म नाहीत" | पुढारी

कालीचरण महाराज : "भारतात फक्त सनातन धर्मच आहे; ख्रिश्चन-इस्लाम धर्म नाहीत"

लखनौ, पुढारी ऑनलाईन : धर्म संसदेत वादग्रस्त वक्तव्य करणारे कथित कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त भाष्य केले आहे. ते म्हणाले, “हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी सर्व हिंदुंनी एकत्र यायला पाहिजे. त्याचबरोबर धर्माच्या आधारे मतदान केले पाहिजे. भारतात केवळ सनातन धर्म आहे. इस्लाम, ख्रिश्चन हे धर्म नाहीत”, असे वक्तव्य कालीचरण महाराजांनी केलेले आहे.

अलिगड संत समागमामध्ये कालीचरण महाराज बोलत होते. ते म्हणाले, “या देशात लाखो मंदिरं तोडली गेली. हजारो महिलांवर बलात्कार झाले. जर हिंदू राष्ट्र बनलं नाही, तर हे होतंच राहील. राजकीय इच्छाशक्ती दाखवली तर हिंदू राष्ट्राची स्थापना होऊ शकते. इराक, इराण, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानसह अनेक देश आपल्या हातून गेले आणि मुस्लिम देश झाले.”

यापूर्वीची कालीचरण महाराजांनी वादग्रस्त वक्तव्ये

छत्तीसगडमध्येही नुकत्याच आयोजित केलेल्या धर्मसंसदेत धर्मगुरू कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्यासंदर्भात अपमानकारक विधानं केलेली आहेत. इतकंच नाही तर नथुराम गोडसेच्या हत्येचं समर्थनही त्यांनी केलं होतं. कालीचरण महाराज लोकांना उद्देशून म्हणाले की, “धर्माच्या रक्षणासाठी एका कट्टर हिंदू नेत्याला प्रमुख बनवायला हवे.” यापूर्वीही हरिद्वारमध्ये आयोजित केलेल्या धर्मसंसदेतही धर्मगुरूंनी हिंदूना शस्त्रं उचलण्यास सांगितले.

नथुराम गोडसेला सलाम करतो : कालीचरण

धर्मगुरू कालीचरण महाराज महात्मा गांधी यांच्या संदर्भात अपमानजनक शब्द वापरताना म्हणाले की, “नथुराम गोडसे यांनी महात्मा गांधीची हत्या करून योग्य पाऊल उचलले. इस्लाम धर्माचे लक्ष्य हे राजकारणाच्या माध्यमातून राष्ट्रावर नियंत्रण ठेवणं आहे. आपल्या डोळ्यांदेखत १९४७ साली राष्ट्रावर नियंत्रण मिळवलं होतं. यापूर्वी इराण, इराक आणि अफगाणिस्तानावर नियंत्रण मिळवलं होतं. राजकारणाच्या माध्यमातूनही पाकिस्तान आणि बांगला देशावर नियंत्रण मिळवलं. मी नथुराम गोसडे यांना सलाम करतो. कारण, त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली.” त्यांच्या या विधानावर उपस्थितीतांनी टाळ्या वाजवून दुजोरा दिला होता.

“हिंदू धर्माचे रक्षण करणे, हे आमचे मुख्य कर्तव्य आहे. आपल्याला सरकारमध्ये एक कट्टर हिंदू राजा (राजकीय नेता) निवडून द्यायला हवा. आपल्या घरामध्ये स्त्रीया खूप संस्कारी आणि सभ्य आहे. त्या मतदानासाठी बाहेर जात नाहीत. पण, ज्यावेळी सामुहिक अत्याचार केला जाईल तेव्हा घरात बसलेल्या महिलांचे काय होईल. महामुर्खांनो… मी त्या माणसांना बोलावत आहे जे मतदान करण्यासाठी घरातून बाहेरच येत नाहीत.”

हिंदुंनी धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलावीत

यापूर्वीही उत्तराखंड येथील हरिद्वारमध्ये आयोजित केलेल्या धर्मसंसदेतील एक भडकाऊ भाषणाची क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर वादाला तोंड फुटले. खरंतर या धर्मसंसदेत वादग्रस्त विधानं करताना भाषणात सांगितले की, धर्माच्या रक्षणासाठी हिंदुंनी शस्त्र उचलणं आवश्यक आहेत. कोणत्याही परिस्थितीत या देशाचा पंतप्रधान हा मुस्लीम होता कामा नये. त्याचबरोबर मुस्लिम समाजातील वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण आणायला हवे.

हे वाचलंत का? 

Back to top button