दिल्ली तापली ! राजधानीत अनेक ठिकाणी पारा ४३ अंश सेल्सिअसवर | पुढारी

दिल्ली तापली ! राजधानीत अनेक ठिकाणी पारा ४३ अंश सेल्सिअसवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्‍तसेवा : मे महिना येण्याच्या आधीच उष्णतेने लोकांना पिळून काढले असून दिल्‍ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात अनेक ठिकाणी पारा 43 अंश सेल्सिअसवर गेला आहे. मे महिन्यात पारा 46 अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. दिल्‍लीच्या सफदरजंग हवामान केंद्राला बेस स्टेशन म्हणून ओळखले जाते. याठिकाणी गुरुवारी तापमान 43.5 अंश इतके नोंदविले गेले. एप्रिल महिन्यातला कमाल तापमानाचा हा गेल्या बारा वर्षातला उच्चांकी स्तर आहे.

याआधी 18 एप्रिल 2010 रोजी दिल्‍लीत एप्रिलमध्ये कमाल 43.7 अंश सेल्सियस इतके तापमान नोंदविले गेले होते तर 29 एप्रिल 1941 रोजी 45.6 अंश सेल्सिअस तापमानाचा कमाल उच्चांक नोंदविला गेला होता. सफदरजंग हे बेस स्टेशन म्हणून ओळखले जाते, मात्र दिल्‍लीच्या विविध भागात तापमान 45 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले असल्याचे हवामान खात्याचे अधिकारी आर. के. जेनामनी यांनी नमूद केले.

हरियाणा, दिल्‍ली, पश्‍चिम उत्‍तर प्रदेश तसेच मध्य प्रदेश या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवस तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाजही त्यांनी व्यक्‍त केला. दिल्‍लीसाठी हवामान खात्याने याआधीच ऑरेंज अ‍ॅलर्ट जारी केलेला आहे.

Back to top button