रशिया- युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी २ मे पासून युरोप दौऱ्यावर, ‘या’ देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार | पुढारी

रशिया- युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी २ मे पासून युरोप दौऱ्यावर, 'या' देशांच्या प्रमुखांशी चर्चा करणार

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन

पंतप्रधान नरेंद्र मोदी २ ते ४ मे दरम्यान जर्मनी, डेन्मार्क आणि फ्रान्स दौऱ्यावर जाणार आहेत. २०२२ मधील पंतप्रधानांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे रशिया- युक्रेन युद्धादरम्यान पंतप्रधान मोदी युरोप दौऱ्यावर जात आहेत. यामुळे पंतप्रधानांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.

युरोप सतत भारताला रशियावरील अवलंबित्व कमी करण्यास सांगत आहे. याशिवाय रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी भारताने मध्यस्थी केली तर आपला कोणताही आक्षेप नाही, असे रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी म्हटले होते. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदी तिन्ही देशांशी चर्चा करून संकटावर तोडगा काढण्यावर चर्चा करु शकतात.

PM मोदी बर्लिनमध्ये जर्मनीचे फेडरल चॅन्सलर ओलाफ स्कोल्झ यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. हे दोन नेते भारत-जर्मनी सहाव्या आंतर-सरकारी सल्लामसलत (आयजीसी) बैठकीत सहभागी होणार आहेत. दरम्यान, भारत आणि फ्रान्स यांच्यात प्रदीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. फ्रान्सची भारतात अठराव्या शतकापासून भूमिका राहिली आहे.

Back to top button