भारत-फ्रान्स मैत्री : नवा अध्याय | पुढारी

भारत-फ्रान्स मैत्री : नवा अध्याय

बदलत्या परिस्थितीत फ्रान्स हा भारताचा एक चांगला मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे ( भारत-फ्रान्स मैत्री ). फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी वाटाघाटी केल्या. त्यांनी बहुध्रुवीय व्यवस्था तयार करण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कायद्याच्या राज्याचे संरक्षण होण्यासाठी भारताच्या सहभागाची मागणी केली.

भारत आणि फ्रान्स ( भारत-फ्रान्स मैत्री ) यांच्यात प्रदीर्घकाळ मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. फ्रान्सची भारतात अठराव्या शतकापासून भूमिका राहिली आहे. फ्रान्सचे जनरल डुप्लिक्स यांनी त्यावेळी दख्खनचे मुर्जफा जंग आणि चंदासाहिब बाजूने कर्नाटकच्या लढाईत ब्रिटनच्या रॉबर्ट क्लाईव्हच्या सेनेविरुद्ध भाग घेतला होता. फ्रान्सच्या सेनेचे अ‍ॅडमिरल सुफफ्रे यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधातील दुसर्‍या लढाईत म्हैसूरला मदत केली होती. त्यानंतर ईस्ट इंडिया कंपनीचा भारताभोवतीचा विळखा अधिक घट्ट होत गेला आणि फ्रान्सचे अस्तित्व पुड्डुचेरी, करिकल, यमन आणि चंदननगरपुरते मर्यादित राहिले. ब्रिटिश साम्राज्य आणि फ्रान्सच्या सैन्याला पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धात भारतीय-ब्रिटिश सैन्याने साथ दिली आणि इतरही काही महत्त्वाच्या लढाया त्यांच्यासोबत लढल्या. या लढायांमध्ये सुमारे 42 हजार भारतीय सैनिक शहीद झाले होते.

या झाल्या इतिहासातील घडामोडी. फ्रान्सच्या संरक्षणमंत्री फ्लोरेन्स पार्ली यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी वाटाघाटी केल्या. यात जागतिक आव्हाने, द्विपक्षीय संरक्षणविषयक सहकार्य, क्षेत्रीय सुरक्षितता आणि अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली. फ्रान्सच्या संरक्षणमंत्र्यांनी बहुध्रुवीय व्यवस्था तयार करण्यासाठी, तसेच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत कायद्याच्या राज्याचे संरक्षण होण्यासाठी भारताच्या सहभागाची मागणी केली. फ्लोरेन्स पार्ली यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या समवेत झालेल्या बैठकीदरम्यान सागरी सुरक्षितता, संयुक्त युद्धसराव, राफेल लढाऊ विमानांचे वेळेवर आगमन, दहशतवादाचा मुकाबला आणि मेक इन इंडिया या मुद्द्यांवर चर्चा केली. एका ‘थिंक टँक’सोबत विचारविनिमय करताना पार्ली यांनी भारताला गरज पडल्यास अतिरिक्त राफेल विमाने देण्यास तयार आहे, असे विधान केले. कोरोना महारोगराई असतानासुद्धा फ्रान्सने भारताला निर्धारित वेळेत 33 राफेल लढाऊ विमाने दिली आहेत. ( भारत-फ्रान्स मैत्री )

युद्धशास्त्रामध्ये असे म्हटले जाते की, आपले सामर्थ्य हे आपले संरक्षणकवच असते. बलशाली राष्ट्राविरुद्ध डोळे वटारून पाहण्याची हिंमत केली जात नाही. याउलट कमजोर, लेचेपेचे असलेल्या राष्ट्राला सहजगत्या लक्ष्य केले जाते. त्यामुळे युद्धासाठीच नव्हे, तर युद्ध टाळण्यासाठीही संरक्षणसज्जता, सामरिक सामर्थ्य गरजेचे असते. राफेल लढाऊ विमानांच्या आगमनाकडे त्या परिप्रेक्ष्यातून पाहणे गरजेचे आहे. आजघडीला राफेल हे जगातील सर्वोत्तम असे लढाऊ विमान मानले जाते. संपूर्ण आशिया खंडामध्ये एकाही देशाकडे राफेलच्या तोडीचे लढाऊ विमान आजघडीला नाही. अत्याधुनिक हत्यारांनी युक्तअसलेले राफेल हे जेएफ-17 थंडर या विमानापेक्षाही सरस आहे. जेएफ-17 हे चीन आणि पाकिस्तान यांची संयुक्त निर्मिती असणारे लढाऊ विमान आहे. राफेलची लांबी अमेरिकेच्या एफ-16 या लढाऊ विमानापेक्षा 0.79 फूट अधिक आहे. हवेत राफेलचा मुकाबला करण्यासाठी शत्रूला चार-पाच लढाऊ विमानांचा वापर करावा लागेल. राफेल विमानांमध्ये अतिअत्याधुनिक मिटिओर आणि स्काल्प क्षेपणास्त्र तैनात केली आहेत, ज्यामुळे अगदी खोलवर असलेले लक्ष्य भेदणेही शक्य होणार आहे. भारताने सप्टेंबर 2016 मध्ये फ्रान्ससोबत सुमारे 59 हजार कोटींच्या 36 राफेल विमानांची खरेदी करण्यासाठी करार केला होता. भारताने आणखी 36 राफेल विमाने खरेदी करावीत, यासाठी बोलणी करण्याची इच्छा आता फ्रान्स व्यक्त करीत आहे.
याखेरीज पार्ली यांनी चीनच्या संदर्भाने जी वक्तव्ये केली आहेत, त्यावरून भारत आणि फ्रान्सची विचारधारा समान असल्याचे स्पष्ट होत आहे. हिंद प्रशांत तसेच दक्षिण चीन समुद्रात चीन खूपच आक्रमक होत चालला आहे, तसेच सागरी वाहतुकीचे स्वातंत्र्य अबाधित आणि आंतरराष्ट्रीय नियमांचे पालन होईल, अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे, असे त्या म्हणाल्या. चीनसोबत फ्रान्सची व्यापार आणि वाणिज्यविषयक भागीदारी आहे, हे पार्ली यांनी मान्य केले. परंतु, चीनची या व्यापारातील आक्रमकता वाढत चालली आहे. हिंद-प्रशांत क्षेत्र हे खुले आणि सर्वसमावेशक क्षेत्र म्हणून संरक्षित करण्याची फ्रान्सची इच्छा आहे आणि कोणत्याही दबावापासून हे क्षेत्र मुक्त असायला हवे, असेही त्या म्हणाल्या.

पार्ली यांच्या दौर्‍यामुळे भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंधांचा नवा अध्याय सुरू झाला आहे. 1980 च्या दशकाच्या सुरुवातीला फ्रान्सने भारताबरोबर आपले संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू केला. या प्रयत्नांना 1998 मध्ये फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती शिराक यांच्या भारत दौर्‍यात यश आले आणि दोन्ही देशांदरम्यान लष्करी सहकार्याविषयीचा करार झाला. 2008 मध्ये भारताच्या प्रजासत्ताक दिनी फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती निकोलस सरकोजी प्रमुख अतिथी होते. त्यानंतर सप्टेंबर 2008 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी फ्रान्सचा दौरा केला. यावेळी अणुकरारावर स्वाक्षर्‍या झाल्या. राष्ट्रपती निकोलस सरकोजी यांनी 2010 मध्ये भारताचा पुन्हा दौरा केला आणि 2013 मध्ये फ्रान्स्वा ओलांद यांनी फ्रान्सचे तत्कालीन राष्ट्रपती या नात्याने भारत दौरा केला. 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौर्‍यात लढाऊ विमानांच्या खरेदी करारावर स्वाक्षर्‍या झाल्या. सध्या फ्रान्सच्या सुमारे 1000 कंपन्या भारतात आहेत. त्यात 3 लाख भारतीयांना रोजगार मिळाला आहे आणि त्यांचा एकूण व्यापार 20 अब्ज डॉलर एवढा आहे. फ्रान्स हा भारतातील नववा सर्वांत मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे. फ्रान्समध्ये भारताच्या सुमारे 130 कंपन्या कार्यरत आहेत.

फ्रान्स आणि भारतादरम्यान 1982 मध्ये 36 मिराज 2000 लढाऊ विमानांच्या खरेदीचा करार झाला होता. कारगिल युद्धावेळी ही विमाने अत्यंत उपयुक्त ठरली होती. फ्रान्सने स्कॉर्पिन पाणबुड्यांच्या उत्पादनाचे तंत्रज्ञानही भारताला हस्तांतरित केले होते. माझगाव डॉकयार्डमध्ये या पाणबुड्यांची बांधणी होत आहे. ‘कलवरी’ ही पहिली स्कॉर्पिन पाणबुडी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात संयुक्त युद्धसरावही वारंवार केला जातो आणि या व्यतिरिक्त नैसर्गिक आपत्ती, तसेच मानवी मुद्द्यांवरील सहकार्याच्या वेळीही दोन्ही देशांदरम्यान देवाणघेवाण वाढत आहे. दोन्ही देशांदरम्यान व्यापार विस्ताराच्या विषयावरही चर्चा सुरू राहतात. बदलत्या परिस्थितीत फ्रान्स हा भारताचा एक चांगला मित्र असल्याचे स्पष्ट झाले आहे.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन

Back to top button