बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एलआयसी IPO येण्याचा मुहूर्त अखेर ठरला ! | पुढारी

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित एलआयसी IPO येण्याचा मुहूर्त अखेर ठरला !

पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनची (एलआयसी) इनिशियल पब्लिक ऑफरिंग (आयपीओ) ४ मे रोजी येईल आणि ९ मे रोजी बंद होईल. पीटीआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे. पीटीआयच्या अहवालानुसार, एलआयसी आयपीओच्या माध्यमातून सरकार सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीतील साडे तीन टक्के हिस्सा विकणार आहे. त्यामुळे सरकारला २१ हजार कोटी रुपये मिळतील.
आयपीओच्या आधारे एलआयसीचे मूल्यांकन ६ लाख कोटी रुपये आहे. फेब्रुवारीमध्ये सरकारने एलआयसीमधील पाच टक्के स्टेक किंवा ३१.६ कोटी शेअर्स विकण्याची योजना आखली होती. या संदर्भातील कागदपत्रे सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) सादर करण्यात आली.

इश्यू साइज कमी करण्याची चर्चा चालू होती

रशिया-युक्रेन युद्धामुळे बाजारात आलेल्या अस्थिरतेमुळे आयपीओ योजनेलाही बाधा आली. गेल्या आठवड्यात, सरकारने इश्यू आकार साडे तीन टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला होता. पाच टक्के भागविक्रीच्या नियमातून सूट मिळण्यासाठी सरकारने सेबीला कागदपत्रेही दिली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सेबीचे नियम काय आहेत ?

सेबीच्या नियमांनुसार १ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्यांकन असलेल्या कंपन्यांना आयपीओमध्ये पाच टक्के हिस्सा विकणे आवश्यक आहे. मिलिमन अॅडव्हायझर्स या आंतरराष्ट्रीय मूल्यांकन कंपनीने ३० सप्टेंबर २०२१ रोजी एलआयसीचे मूळ मूल्य ५.४ लाख कोटी रुपये ठरवले होते.
गुंतवणूकदारांकडून मिळालेल्या तपशिलानुसार, एलआयसीचे बाजार मूल्य त्याच्या अंतर्निहित मूल्याच्या १.१ पट किंवा सुमारे ६ लाख कोटी रुपये आहे. सरकारने चालू आर्थिक वर्षात निर्गुंतवणुकीतून ६५ हजार कोटी रुपये उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यामध्ये एलआयसीच्या आयपीओचा मोठा वाटा असेल.

हे ही वाचलं का ?

Back to top button