योगी आदित्‍यनाथ यांचे नाव शोधायला गेला, १ लाख रुपयांचा दंड बसला! | पुढारी

योगी आदित्‍यनाथ यांचे नाव शोधायला गेला, १ लाख रुपयांचा दंड बसला!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : उत्तर प्रदेशचे मुख्‍यमंत्री योगी आदित्‍यनाथ त्‍यांचे नाव कसे आहे? अजय सिंह बिष्‍ट की आदित्‍यनाथ हे स्‍पष्‍ट करण्‍यात यावे, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्‍यास अलाहाबाद उच्च न्यायालयाने दंडाचा दणका दिला आहे. सवंग लोकप्रियतेसाठी ही याचिका दाखल केल्‍याचा युक्‍तीवाद सरकारी वकिलांनी केला. यानंतर न्‍यायालयाने याचिकाकर्त्यास फटकारत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सहा आठवड्यात हा दंड जमा करण्‍याचे आदेश दिले. दंडाची रक्‍कम प्रयागराजमधील एका दिव्‍यांग आश्रमाला दिली जाणार आहे.

योगी आदित्‍यनाथ यांचे नाव काय ?

योगी आदित्‍यनाथ यांच्‍या नावासंदर्भात दिल्‍लीतील एकाने अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयात याचिका दाखल केली होती. यामध्‍ये म्‍हटलं होते की, योगी आदित्‍यनाथ यांचे नाव कसे आहे? अजय सिंह बिष्‍ट की आदित्‍यनाथ योगी? निवडणुकीच्‍या उमेदवारी अर्जावर त्‍यांचे नाव आदित्‍यनाथ पुत्र अवैद्यनाथ असे आहे.  उत्तर प्रदेशचे मुख्‍य सचिव यांच्‍या ट्‍विटर हँडलवर महंत योगी आदित्‍यनाथ जी महाराज असे नाव आहे. त्‍यांच्‍या वेगवेगळ्या नावांमुळे राज्‍यातील ३२ कोटी लोकांच्‍या मनात त्‍यांच्‍या नावाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. त्‍यांना योग्‍य नाव लिहिण्‍याचे आदेश देण्‍यात यावेत, अशी मागणी या याचिकेतून करण्‍यात आली होती. याचिकामध्‍ये योगी आदित्‍यनाथ यांच्‍यासह निवडणूक आयोग, केंद्र सरकार, उत्तर प्रदेशचे मुख्‍य सचिव यांना पक्षकार बनविण्‍यात आले होते.

सवंग लोकप्रियेतसाठी याचिका

योगी आदित्‍यनाथ यांच्‍या नावासंदर्भात दाखल याचिकाच चुकीची आहे. याचिकाकर्ता याने उच्‍च न्‍यायालयाच्‍या नियमानुसार आपली ओळख स्‍पष्‍ट करणे आवश्‍यक आहे. त्‍याने आपली ओळख स्‍पष्‍ट केलेली नाही. केवळ सवंग लोकप्रियतेसाठी ही याचिका दाखल करण्‍यात आली आहे, असा युक्‍तीवाद सरकारी वकील मनीष गोयल यांनी केला. अलाहाबाद उच्‍च न्‍यायालयाचे मुख्‍य न्‍यायाधीश राजेश बिंदल आणि न्‍यायमूर्ती पीयूष अग्रवाल यांच्‍या खंडपीठाने ही याचिका फेटाळली. न्‍यायालयाने याचिकाकर्त्यास फटकारत एक लाख रुपयांचा दंड ठोठावला. तसेच सहा आठवड्यात हा दंड जमा करण्‍याचे आदेश दिले. या दंडाची रक्‍कम ही प्रयागराजमधील दिव्‍यांग आश्रमासाठी दिली जाणार आहे.

हेही वाचा : 

पाहा व्‍हिडीओ :

 

 

Back to top button