Edible oil prices : पामतेलाचे दर ६ टक्क्यांनी भडकले, इंडोनेशियाच्या तेलनिर्यात बंदीचा फटका | पुढारी

Edible oil prices : पामतेलाचे दर ६ टक्क्यांनी भडकले, इंडोनेशियाच्या तेलनिर्यात बंदीचा फटका

नवी दिल्ली, पुढारी वृत्‍तसेवा : इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. या पार्श्‍वभूमीवर जागतिक बाजारात पाम तेलाचे दर कडाडले असून याचा परिणाम भारतावरही होण्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे. मागणीइतका पाम तेलाचा पुरवठा नसल्याने आगामी काळात खाद्यतेल सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ शकते. दरम्यान सॉल्व्हंट एक्स्ट्रॅक्टर्स असोसिएशनने इंडोनेशियन सरकारसोबत बोलणी करुन बंदी उठविण्याबाबत चर्चा करावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.

युक्रेन आणि रशिया यांच्यादरम्यानच्या युध्दामुळे सूर्यफूलाचा जागतिक पुरवठा कोलमडून पडला आहे. त्यातच आता इंडोनेशियाने पाम तेलाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. इंडोनेशिया आणि मलेशिया हे पाम तेलाचे सर्वात दोन मोठे निर्यातदार आहेत. इंडोनेशियाच्या बंदीनंतर भारत, बांगलादेश, पाकिस्तान आदी देशांना पामतेलासाठी मलेशियावर भिस्त ठेवावी लागणार आहे. अशा स्थितीत पाम तेलाचे दर मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत हा पामतेलाचा जगातला सर्वात मोठा आयातदार आहे. गेल्या दोन – तीन दिवसांतच पामतेलाचे दर सहा टक्क्यांनी भडकले आहेत. पाम तेलावरील बंदीमुळे सूर्यफूल, सोयाबीन, राईस ब्रान, भूईमूग आदी तेलांच्या दरातही वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे खाद्यतेल उत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

अनेक उद्योगांमध्ये पाम तेलाचा कच्चा माल म्हणून वापर केला जातो. अशा स्थितीत पाम तेलाच्या दरवाढीचा फटका संबंधित उद्योगांना बसणार आहे. रशिया हादेखील मोठा खाद्यतेल निर्यातक देश आहे. मात्र प्रतिकूल हवामानामुळे तेथील तेलबियांचे पीक संकटात आलेले आहे. गेल्या सहा महिन्यांच्या कालावधीत पाम तेलाचे दर पन्नास टक्क्यांनी वाढलेले आहेत. हे दर आणखी वाढण्याची शक्यता ताज्या घडामोडींमुळे निर्माण झाली आहे.

हेही वाचलत का ?

 

Back to top button