देवेंद्र फडणवीस : शिवसेनेने राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते करण्याचा वीडा उचलला | पुढारी

देवेंद्र फडणवीस : शिवसेनेने राणा दाम्पत्याला राष्ट्रीय नेते करण्याचा वीडा उचलला

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आमदार रवी राणा (MLA Ravi Rana) आणि खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांना राष्ट्रीय नेते करण्याचा वीडा शिवसेनेने उचलला आहे का? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केला. राणा दाम्पत्य मातोश्री बाहेर जाऊन एखाद्या कोपऱ्यात उभे राहून हनुमान चालिसा म्हणून परत गेले असते. कोणी दखलही घेतली नसती. परंतु, इतकी माणसे जमा करून हल्ले करायचे, राणा यांच्या मुंबईतील निवासस्थानी माणसे जमा करायची ही कोणती बुद्धी आहे हेच कळत नाही, असा टोला फडणवीस यांनी हाणला.

कोणी हनुमान चालीसा म्हणत असेल तर त्यावर एवढा राडा कशासाठी करायचा. मुळातच कोणाच्याही घरी आंदोलन करण्याला भाजपाचा विरोध आहे. पण, कोणी हनुमान चालीसा म्हणतो म्हटल्यावर इतकी माणसे गोळा करायची गरज नव्हती. कदाचित असे केल्यामुळे आपल्याला मोठी सहानुभूती मिळेल असे सेना नेत्यांना वाटत असेल. पण, अशी सहानुभूती मिळण्याचे काही कारण नाही. एकूणच शिवसेना आणि गृहविभागाने या प्रकरणाची चुकीची हाताळणी केली आहे, असे देखिल देवेंद्र फडणवीस म्हणाले.

मोहीत कंबोज (mohit kamboj) यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला. पोलिसांना हाताशी धरूनच सगळे चाललेले आहे. कंबोज यांच्यावर हल्ला तर केलाच. पण, त्यांच्यावरच गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न केले. पण, यांच्या दुदैवाने कंबोज जिथून निघाले तिथपासून ते हल्ला झाला तिथपर्यतच्या मार्गावर सीसीटीव्ही आहे. त्यात सर्व चित्रण आलेले आहे. त्यामुळे मुंबई पोलिस आता काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे, असे फडणवीस म्हणाले. सत्तेचा माज पोलिसांच्या भरवशावर सुरू असल्याची टीका फडणवीस यांनी केली.

आपण गृहमंत्री असताना अशी परिस्थिती निर्माण होत असल्याबद्दल वळसे पाटील (dilip walse patil) यांना कमीपणा वाटायला हवा. या सरकारने गृहमंत्रालयाचे अक्षरश: बारा वाजवले आहे. आपले अपयश लपवण्यासाठी राष्ट्रपती शासनाची कारणे सांगून सहानुभूती मिळवण्याचे प्रयत्न आहे.

राऊतांना कोणी विचारीत नाही

संजय राऊतांना (Sanjay Raut) कोण विचारतोय. त्यांचे अस्तित्व काय आहे. उद्या ते अमेरिकेच्या राष्ट्रपतीला घाबरत नाही असेही म्हणतील. पण, अमेरिकेचे राष्ट्रपती त्यांना हुंगतही नाही. असे रोजचे स्टेटमेंट देऊन हे कागदी नेते राजकारणात बदल घडवून आणू शकत नाही. संजय राऊतांना आम्ही व त्यांचा पक्षही गांभीर्याने घेत नाही. ते सौजन्याची भाषा करतात हेच एक आश्चर्य आहे. त्यांची वक्तव्य संपूर्ण कुटुंब एकत्र बसून ऐकू शकत नाहीत. त्यामुळे हे शिवराळ आहेत.

Back to top button