उत्तरेत कोरोनाचा जोर; मुंबई अलर्ट | पुढारी

उत्तरेत कोरोनाचा जोर; मुंबई अलर्ट

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा : दिल्ली एनसीआर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली असून, हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा मास्कसक्ती लागू करण्यात आली आहे. हा मुंबईला इशारा समजला जातो.

दिल्ली एनसीआर क्षेत्रात दोन दिवसांपासून कोरोनाचे 500 हून अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. चिंतेची बाब म्हणजे, 11 ते 18 एप्रिल या काळात कोरोनाबाधेचे प्रमाण तिप्पट झाले आहे. उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर, गाझियाबाद, हापूर, मीरत, बुलंदशहर आणि बागपत या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असून, सक्रिय रुग्णांची संख्या 695 वर गेली आहे.

एकट्या गौतम बुद्धनगर जिल्ह्यातच मंगळवारी कोरोनाच्या 107 नव्या रुग्णांचे निदान झाले; त्यापैकी 33 शालेय विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे हरियाणातील गुरुग्राम, फरीदाबाद, सोनिपत आणि झज्जर या जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील सहा आणि हरियाणातील चार जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे.

दिल्ली आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांतून मुंबईत दररोज सुमारे 19 ते 20 मेल-एक्स्प्रेस येतात. मध्य रेल्वेवर उत्तर प्रदेश येथून सर्वाधिक गाड्या येतात. दररोज सुमारे 10 ते 12 एक्स्प्रेस उत्तर प्रदेश येथून सीएसएमटी, एलटीटी येथे येतात. एका गाडीतून अंदाजे एक हजार 500 प्रवासी येतात.

म्हणजेच दिवसाला 10 गाड्या जरी मुंबईत येतात असे म्हटले तरी सुमारे 15 हजार प्रवासी मुंबईत दाखल होतात. तेवढेच प्रवासी मुंबईतून या गाड्यांमधून जातात. यामध्ये पुष्पक एक्स्प्रेस, महानगरी एक्स्प्रेस, उद्योग नगरी एक्स्प्रेस, वाराणसी या गाड्यांचा समावेश आहे. सीएसएमटीहून दिल्लीकरिता एक राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येते. पश्चिम रेल्वेवरून खासकरून दिल्लीकरिता एक्स्प्रेस सुटतात. बांद्रा टर्मिनस, मुंबई सेंट्रल येथून दिल्लीकरिता दिवसाला 9 ते 10 गाड्या चालविण्यात येतात.

यामध्ये संपर्क क्रांती एक्स्प्रेस, पश्चिम एक्स्प्रेस, गरीब रथ, दुरान्तो, राजधानी एक्स्प्रेस, अगस्त क्रांती एक्स्प्रेसचा समावेश आहे. पश्चिम रेल्वेवर एका गाडीतून अंदाजे दीड हजार प्रवासी येतात. सध्या रेल्वे स्थानकावर उतरणार्‍या प्रवाशांची चाचणी केली जात नाही. साधे तापमानही पाहिले जात नाही. अशा गाफील परिस्थितीत दिल्ली, उत्तर प्रदेशचा कोरोना मुंबईत दाखल होण्याची भीती आता जाणकार व्यक्त करत आहेत.

मुंबईत 85 नवे रुग्ण

मुंबईत मंगळवार 19 एप्रिलला 24 तासांत 85 रुग्णांची नोंद झाली, तर एकाही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. दिवसभरात 52 रुग्ण बरे झाले. सक्रिय रुग्णांची संख्या 390 इतकी आहे. गेल्या 24 तासांत 9 हजार 372 चाचण्या करण्यात आल्या.

Back to top button