

Delhi school student mental harassment: दिल्लीच्या राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर घडलेल्या एका धक्कादायक घटनेने शिक्षण व्यवस्थेतील मानसिक छळाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. सांगलीतील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील मूळ रहिवासी असलेला 16 वर्षीय शौर्य प्रदीप पाटील या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. शौर्यचे वडील दिल्लीत सोन्या-चांदीवर प्रक्रिया करण्याचा व्यवसाय करतात आणि कुटुंब तेथेच स्थायिक आहे.
18 नोव्हेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. सकाळी नेहमीप्रमाणे शौर्य शाळेसाठी घरातून बाहेर पडला होता. त्याच दिवशी वडील आईच्या उपचारासाठी कोल्हापूरला जायच्या तयारीत होते. तेवढ्यात त्यांना शौर्य मेट्रो स्टेशनवरून खाली पडल्याची माहिती देणारा फोन आला. धावपळ करत रुग्णालयात पोहोचेपर्यंत डॉक्टरांनी शौर्यला मृत घोषित केले होते.
या घटनेनंतर शौर्यची शाळेची बॅग तपासण्यात आली आणि त्यात एक चिठ्ठी मिळाली. त्या नोटमध्ये त्याने आई-वडिलांची माफी मागितली आणि आपल्या अवयवांचे दान करण्याची विनंती केली होती. पण सर्वात वेदनादायक गोष्ट म्हणजे त्याने शाळेतील काही शिक्षक आणि मुख्याध्यापकांनी केलेल्या मानसिक छळाचाच उल्लेख आत्महत्येचे कारण म्हणून केला होता.
शौर्यने लिहिले होते “माझ्यावर सतत अन्याय केला जातो. हे पाऊल उचलण्यामागे जबाबदार त्यांनाच ठरवा, म्हणजे दुसऱ्या मुलाला त्रास भोगावा लागणार नाही.” वडील प्रदीप पाटील यांनी तक्रार दिल्यानंतर राजेंद्र नगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापक, को-ऑर्डिनेटर आणि दोन शिक्षकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाटील सांगतात की, मुलगा मागील काही महिन्यांपासून घरी येऊन रडत असे, पण कारण सांगायला कचरायचा. आम्ही शाळेत जाऊन विनंतीही केली, मात्र शौर्यवरचा ताण कमी होण्याऐवजी वाढतच गेला.
त्याच्या काही मित्रांनीही धक्कादायक तपशील सांगितले. गेल्या काही दिवसांपासून एका शिक्षिकेने “तुझ्या पालकांना बोलावून तुझे अॅडमिशन रद्द करेन” अशा धमक्या दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. 18 नोव्हेंबरला वर्गात शौर्यचा तोल जाऊन तो पडल्यावर, त्यावर थट्टा करत “हे सगळं नाटक आहे” असे वर्गासमोर त्याला हिणवण्यात आले.
शौर्य रडू लागल्यावरही “रडलास तरी मला काही फरक पडत नाही” अशा शब्दांत त्याला अधिक त्रास दिला गेला, अशी माहिती मित्रांकडून मिळाली आहे. त्यावेळी मुख्याध्यापकही उपस्थित होते, पण त्यांनी हस्तक्षेप केला नाही असा आरोप आहे.
पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये शौर्य एकटाच प्लॅटफॉर्मवर येताना आणि काही क्षणांतच खाली उडी मारताना दिसतो. त्याच्या मृत्यूची चौकशी सुरु असून संबंधित शिक्षकांची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. या दुर्दैवी घटनेनंतर शौर्यचा अंतिम संस्कार दिल्लीतच करण्यात आला. शिक्षण देणाऱ्यांकडूनच जर मानसिक छळ होत असेल, तर विद्यार्थी कोणाकडे पाहणार.