UP MLC Election : उ. प्रदेश विधान परिषदेत भाजपला बहुमत, सपा-बसपाला ४० वर्षांमध्‍ये जमले नाही ते योगींनी करुन दाखवलं | पुढारी

UP MLC Election : उ. प्रदेश विधान परिषदेत भाजपला बहुमत, सपा-बसपाला ४० वर्षांमध्‍ये जमले नाही ते योगींनी करुन दाखवलं

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत ऐतिहासिक विजयानंतर भाजपने आता राज्‍यातील विधान परिषद निवडणुकही ( UP MLC Election ) बाजी मारली आहे. १९८२ मध्‍ये  राज्‍यातील दोन्‍ही सभागृहांमध्‍ये काँग्रेसला बहुमत मिळवले होते. यानंतर
तब्‍बल ४० वर्षांनंतर सत्ताधारी भाजपने दोन्‍ही सभागृहांमध्‍ये निर्विवाद वर्चस्‍व मिळवले आहे. या निकालाचे दूरगामी परिणाम उत्तर प्रदेश राजकारणावर होतील, असे मानले जात आहे.

UP MLC Election : ३६ पैकी ३३ जागांवर भाजप विजयी

उत्तर प्रदेश विधान परिषदेत एकुण १०० जागा आहेत. नुकत्‍याच यातील ३६ जागांसाठी निवडणका झाल्‍या. यातील ९ जागांवर भाजपचे उमेदवार बिनविरोध निवडून आले हाेते. २७ जागांसाठी मतदान झाले. यातील तब्‍बल २४ जागांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले. तीन जागांवर अपक्षांनी बाजी मारली. विधान परिषदेत बहुमतांसाठी ५१ सदस्‍यांची गरज असते. आता भाजपचे ६७ आमदार आहेत. म्‍हणजे बहुमतापेक्षा तब्‍बल १६ आमदार अधिक आहेत. त्‍यामुळे जे कामगिरी समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी गेल्‍या ४० वर्षांमध्‍ये करु शकली नाही ती भाजपने करुन दाखवली आहे.

अखिलेश यादव यांच्‍याविरोधातील बंडाला हवा मिळणार?

विधानसभा निवडणुकीनंतर विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पार्टीचा नामुष्‍कीजनक पराभव झाला आहे. या निवडणुकीत समाजपवादी पार्टीला एकही जागा जिंकता आली नाही. या निकालाचे परिणाम उत्तर प्रदेशमधील राजकारणावर होणार आहे. अखिलेश यादव यांच्‍या समोर अडचणीत वाढ हाेण्‍याची शक्‍यता आहे. कारण काका शिवपाल यादव आणि ज्‍येष्‍ठ नेते आझम खान यांनी त्‍यांच्‍यावर जाहीर नाराजी व्‍यक्‍त केली आहे. आता विधान परिषदेत निवडणुकीतील पराभवामुळे पक्षातील काही दिग्‍गज नेते त्‍यांची साथ सोडतील, अशी शक्‍यता व्‍यक्‍त हाेत आहे.

विधान परिषद निकालाने भाजपचे बळ वाढवले

विधान परिषदमध्‍ये निर्विवाद वर्चस्‍व मिळवल्‍यामुळे उत्तर प्रदेशमध्‍ये आता भाजपचे बळ वाढले आहे. दोन्‍ही सभागृहांमध्‍ये बहुमत असल्‍याने कोणतेही विधेयक आता बहुमतात मंजूर होण्‍याचा मार्ग मोकळा झाला आहे.

उ. प्रदेश विधान परिषदमधील संख्‍याबळ
भाजप : ६७
समाजवादी पार्टी : १७
बसपा : ४
अपक्ष : ५
काँग्रेस : १
अपना दल : (सोनेलाल) १
शिक्षक आमदार : दोन

हेही वाचा : 

 

Back to top button