आदित्य ठाकरे म्हणाले, “महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही…” | पुढारी

आदित्य ठाकरे म्हणाले, "महाराष्ट्र दिल्लीपुढे झुकणार नाही..."

दापोली, पुढारी वृत्तसेवा : “राज्यातील आघाडी सरकार हे खंबीर असून केंद्रात राज्याची बाजू मांडणारे आमचे आघाडीचे खासदार देखील तत्पर आहेत. केंद्राने राज्यच्या विकासात भर टाकावी अशी मागणी आमचे खासदार करत आहेत. मात्र तरी ही केंद्र शासन महराष्ट्राकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्राला वाटत असावं की, महाराष्ट्राने झुकवं. पण दिल्ली पुढे झुकणार नाही”, असे राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दापोली नगरात बांधण्यात आलेल्या शिवपुतळ्याचे अनावरण प्रसंगी बोलताना सांगितले.

यावेळी मंत्री अनिल परब, उदय सामंत, अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, योगेश कदम, राजन साळवी, अनिकेत तटकरे, माजी आमदार संजय कदम, सुर्यकांत दळवी, नगराध्यक्ष ममता मोरे, राष्ट्रवादीचे संदीप राजपुरे आदी मान्यवर उपस्थित होते. दापोली येथे  अश्वारूढ शिवपुतळ्याचे अनावरण आदित्य ठाकरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

“कोकणातील आणि राज्यातील गडकिल्ले यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. त्याबाबत आघाडी सरकार नियोजन करत असून त्या नुसार गडकिल्ले यांचे संवर्धन होईल. महाविकास आघाडी सरकार हे मजबूत सरकार आहे. त्यामुळे सरकार कायम लोकहिताचे काम करत आहे. सरकारचे कोकणावर अधिक प्रेम आहे आणि त्यामुळे कोकणाला विकासात्मक कायम झुकते माप दिले जात आहे. आघाडी सरकारच्या प्रत्येक नेत्यांचे कोकणावर अधिक प्रेम आहे. त्यामुळे भविष्यात कोकणात पर्यटनातून रोजगार निर्मितीचे स्वप्न पूर्ण होईल”, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

“कोकणात शिक्षण घेतलेला प्रत्येक व्यक्ती हा नोकरीनिमित्त मुबई येथे जात असते. त्यामुळे मुंबई ही कोकणी माणसामुळे बनली आहे. जीपी विमानतळ बांधून सरकारने पहिले कोकणाला दिलेले वचन पूर्ण केले. याला म्हणतात करून दाखवले. सिंधुदुर्ग जिल्यात मेडिकल कॉलेजचे काम सुरू असून, तिथे प्रवेश सुरू आहेत. रायगड अलिबाग येथे देखील अदिती तटकरे यांचे माध्यमातून मेडिकल कॉलेज  होत आहे. कोकणात पायाभूत सुविधांसह शिक्षणावर देखील भर दिला जात आहे”, अशी माहिती ठाकरे यांनी व्यक्त केला.

“राज्यात महाविकास आघाडीचे सरकार मजबूत असून त्यानुसार नगर पंचयात, जिल्हा परिषद, पंचयात समिती येथे आघाडी सरकारच्या माध्यमातून पुढील पाऊल पडले पाहिजे. राज्यात विकास कामांची कमतरता पडू नये, यासाठी आम्ही दौरा करत आहोत. यासाठी आमदार भास्कर जाधव, अनिल परब, खासदार सुनील तटकरे यांचे या मध्ये मार्गदर्शन लाभत आहे”, असेही आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

Back to top button