Alandi : गुढीपाडव्यापासून होणार माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन | पुढारी

Alandi : गुढीपाडव्यापासून होणार माऊलींच्या समाधीचे स्पर्श दर्शन

आळंदी : पुढारी वृत्तसेवा : कोरोना महामारीच्या भीषण संकटामुळे गेले दोन वर्षे बंद असलेले संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी स्पर्श दर्शन गुढीपाडव्यापासून म्हणजेच शनिवार (दि. २) पासून सुरू करण्याचा निर्णय श्री. ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीने घेतला आहे. ही माहिती प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांनी दिली. या निर्णयामुळे माऊलींच्या समाधी स्पर्श दर्शनासाठी गेले दोन वर्षे आसुसलेल्या भाविकांची पावले अलंकापुरीकडे (Alandi) वळणार आहेत.

(Alandi ) कोरोना महामारीच्या भीषण संकटामुळे शासनाच्या निर्णयानुसार दि. १८ मार्च २०२० पासून संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी स्पर्श दर्शन बंद ठेवण्यात आले होते. सध्याची कोरोनाची परिस्थिती विचारात घेता शासनाने विविध निर्बंध शिथिल केले आहेत. त्या अनुषंगाने शासनाच्या निर्णयाला अनुसरून भाविकांच्या तीव्र भावनेचा विचार करता संस्थान कमिटीने स्पर्श दर्शन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार गुढीपाडव्याला सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत समाधी स्पर्श दर्शन सुरू राहील.

दुपारनंतर गुडीपाडव्यानिमित्त परंपरेनुसार समाधीवर चंदनउटीतून श्रीगणेश अवतार रूप साकारण्यात येणार आहे. यासाठी दुपारी २ ते सायंकाळी ५ यावेळेत समाधीऐवजी माऊलींचे पादुका दर्शन घेता येणार आहे. तर सायंकाळी ५ ते रात्री ११ यावेळेत समाधीवरील गणेश अवतार रूप चंदन उटीचे दर्शन भाविकांना उपलब्ध असणार आहे. यादरम्यान विनामंडपात सायंकाळी ४ वाजता जोग महाराज वारकरी संस्थेच्या वतीने कीर्तनसेवा पार पडणार आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button